
वैभव सूर्यवंशीचे धमाकेदार अर्धशतक; चेन्नई सुपर किंग्ज संघावर सहा विकेटने विजय
दिल्ली : आयपीएल स्पर्धेत गुणतालिकेत सर्वात तळाशी असलेल्या दोन संघात झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयासह राजस्थान संघाने आयपीएल स्पर्धेचा निरोप घेतला. १४ सामन्यात राजस्थानने चार विजय नोंदवले तर १० पराभव स्वीकारले. चेन्नई संघाने १०वा पराभव स्वीकारला. वैभव सूर्यवंशी (५७), संजू (४१), यशस्वी (३६), ध्रुव जुरेल (नाबाद ३१) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर राजस्थान संघाने मोठा विजय साकारला.
राजस्थान रॉयल्स संघासमोर विजयासाठी १८८ धावांचे आव्हान होते. यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या धमाकेदार सलामी जोडीने अपेक्षेप्रमाणे आक्रमक सुरुवात केली. खास करुन यशस्वी जैस्वाल याने प्रारंभी अधिक आक्रमक फलंदाजी केली. यशस्वी याने १९ चेंडूत ३६ धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार व दोन षटकार मारले. यशस्वी चौथ्या षटकात संघाची धावसंख्या ३७ असताना बाद झाला.
यशस्वी बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी व कर्णधार संजू सॅमसन या जोडीने आक्रमक फटकेबाजी करत दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी करत सामन्यातील रोमांच कायम ठेवला. १४व्या षटकात राजस्थान संघाला दोन मोठे धक्के अश्विन याने दिले. अश्विन याने संजूला ४१ धावांवर बाद केले. त्याने ३१ चेंडूत तीन चौकार व दोन षटकार मारत दमदार फलंदाजी केली. त्याच षटकात वैभव सूर्यवंशीची आक्रमक खेळी ५७ धावांवर संपुष्टात आली. वैभवने ३३ चेंडूत ५७ धावा फटकावल्या. या अर्धशतकी खेळीत त्याने चार चौकार व चार उत्तुंग षटकार ठोकले.
संजू-वैभव हे एकाच षटकात बाद झाल्यानंतर राजस्थान संघ थोडा बॅकफूटवर आला. नूर अहमद याने रियान पराग (३) याला क्लीन बोल्ड बाद करुन चौथा धक्का दिला. त्यानंतर ध्रुव जुरेल याने अवघ्या १२ चेंडूत नाबाद ३१ धावांची वादळी खेळी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला. जुरेल याने दोन चौकार व तीन षटकार मारले. हेटमायर याने पाच चेंडूत नाबाद १२ धावांचे योगदान दिले. त्याने एक चौकार व एक षटकार मारला. ध्रुव जुरेल याने पाथिराणाला षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. राजस्थान संघाने १७.१ षटकात चार बाद १८८ धावा फटकावत विजयासह आयपीएल स्पर्धेचा समारोप केला. अश्विन याने ४१ धावांत दोन गडी बाद केले.
चेन्नई ८ बाद १८७

राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम चेन्नई सुपर किंग्ज संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. चेन्नई संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. युधवीर सिंग याने डावातील दुसऱ्या आणि त्याच्या पहिल्याच षटकात चेन्नईला दोन मोठे धक्के दिले. युधवीर याने कॉनवे (१०) आणि उर्विल पटेल (०) या आक्रमक फलंदाजांना बाद करुन संघाला मोठे यश मिळवून दिले.
एका बाजूने आक्रमक फटकेबाजी करणारा सलामीवीर आयुष म्हात्रे सहाव्या षटकात बाद झाला. आयुष म्हात्रे याने २० चेंडूत ४३ धावांची दमदार खेळी साकारली. त्याने आठ चौकार व एक षटकार मारला. तुषार देशपांडे याने त्याचा बळी घेतला. रविचंद्रन अश्विन (१३), रवींद्र जडेजा (१) हे भरवशाचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. ७८ धावसंख्येवर चेन्नईचे पाच फलंदाज तंबूत परतले होते.
डेवॉल्ड ब्रेव्हिस आणि शिवम दुबे यांनी सहाव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला. ब्रेव्हिस याने २५ चेंडूत ४२ धावांची धमाकेदार खेळी साकारली. त्याने दोन चौकार व तीन उत्तुंग षटकार मारले. शिवम दुबे याने ३२ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. दुबेने दोन चौकार व दोन षटकार ठोकले. कर्णधार महेंद्रसिंग धोनी १७ चेंडूत १६ धावा काढून बाद झाला. धोनीने एक षटकार मारला. अंशुल कंबोज (नाबाद ५), नूर अहमद (नाबाद २) हे नाबाद राहिले. चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकात आठ बाद १८७ धावसंख्या उभारली.
राजस्थानचा युद्धवीर सिंग आणि आकाश मधवाल हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. त्याने ४७ धावा देत ३ गडी टिपले. आकाश मधवाल याने २९ धावांत तीन गडी बाद केले. तुषार देशपांडे (१-३३) व हसरंगा (१-२७) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.