
मंबई ः पालघर-बोईसर केंद्राच्या अरहान पटेल याने १८३ धावांची खेळी करत आपल्या संघाला पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर विजय मिळवून दिला. ३३व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृति चषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात वाशी केंद्राच्या २०९ धावांना उत्तर देताना पालघर-बोईसर केंद्राने ५ बाद ३१२ धावा उभारत महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती.
कांदिवलीच्या सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर रंगलेल्या या सामन्यात अरहान पटेलने दुसरा दिवस गाजवला. पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे मोजक्याच षटकांचा खेळ झाला होता. अरहान पटेलने वाशी केंद्राच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत २६ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर दीडशतकी खेळी साकारली.
अन्य सामन्यांत, हर्ष कदम आणि समृद्ध भट यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ठाणे केंद्र अ संघाने दुसऱ्या दिवशी ६ बाद ३४३ धावांचा डोंगर उभा केला. चेंबूरच्या आरसीएफ मैदानावर रंगलेल्या या सामन्यात हर्ष कदमने ११९ चेंडूत १०० धावा तर समृद्ध भटने १४७ चेंडूंत १०९ धावा फटकावल्या.
त्याचबरोबर विरारच्या अवर्स क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात मालाड केंद्राचा पहिला डाव ४८.१ षटकांत १५१ धावांवर संपुष्टात आला. त्यात स्वयम वामने आणि अद्वैत भट यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
प्रत्युत्तरादाखल कांदिवली केंद्राने ८ बाद २१८ धावा रचत पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर विजय साकारला. कांदिवली केंद्राच्या अंश पटेल याने ८२ चेंडूंत १५ चौकार आणि २ षटकारांनिशी नाबाद १०१ धावांची खेळी उभारली. त्याला हर्षित बोबडे याने ३८ धावा करत चांगली साथ दिली.
माटुंग्याच्या रमेश दडकर मैदानावर झालेल्या सामन्यात पावसामुळे पहिल्या दिवसाचा पूर्ण खेळ वाया गेला होता. दुसऱ्या दिवशी एमसीए अकादमी अ केंद्राच्या अर्जुन गडोया याने १७९ चेंडूंत १४५ धावा तडकावल्या. एमसीए अकादमी अ केंद्राने आझाद मैदान केंद्राविरुद्ध सर्वबाद ३८४ धावा केल्या होत्या.