
सागरी जलतरणात १ सुवर्णासह २ कांस्य, पिंच्याक सिलॅट प्रकारात दुहेरीत सुवर्णपदक
दीव ः भल्या पहाटे रंगलेल्या पहिल्या खेलो इंडिया बीच स्पर्धेतील सागरी जलतरणात दीक्षा यादवच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राने स्पर्धेतील सुवर्ण सकाळ अनुभवली. १० मीटर स्विमथॉन प्रकारात महाराष्ट्राने दीक्षाच्या सुवर्णपदकासह २ कांस्यपदकांची कमाई केली. बीच पेंचक सिलटमध्ये देखील महाराष्ट्राने स्पर्धेतील पहिले सुवर्णयश संपादले. २ सुवर्णांसह ९ पदकांची लयलूट करीत महाराष्ट्र पदकतक्यात तिसऱ्या स्थानावर आहे.

दीवच्या अरबी समुद्रात पहाटे ६ वाजता १० मीटर स्विमथॉनचा थरार रंगला. महिलांच्या गटात सुरूवातीपासून महाराष्ट्राच्या १९ वर्षीय दीक्षा यादवने मुसंडी मारली होती. २ मिनिटे १८.०९ सेकंद वेळेत शर्यतीचा पल्ला पार करीत दीक्षाने सुवर्णपदक पटकावले. रौप्य व कांस्य पदकांसाठी अनुक्रमे महाराष्ट्राच्या पूर्वा गावडे व तामिळनाडूच्या एम आरना यांच्यात शर्यत रंगली. दोघींनीही एकाच वेळी अंतिम रेषा पार केली. अवघ्या १४ दशांश सेकंदाने पूर्वाला रूपेरी यशाने हुलकावणी दिली. २.१८.३८ वेळ देत आरनाने रौप्य, तर २.१८.५२ वेळ नोंदवून पूर्वाने कांस्यपदक जिंकले.
साताऱ्यातील दीक्षा आणि सिंधूदुर्गच्या पूर्वा या दोन्ही खेळाडू पुण्यातील शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीत सराव करतात. ५० मीटर फ्रीस्टाईल खेलो इंडिया विद्यीपीठ स्पर्धेतही दिक्षाने पदक जिंकले आहे. मुलांच्या स्विमथॉन प्रकारातही महाराष्ट्रचे जलतरणपटू चकमले. चैतन्य शिंदेने २.१३.१४ वेळ देत कांस्यपदकाचे यश संपादन केले. कर्नाटकच्या रेणुकाचार्या होदमानीने सुवर्ण, तर पश्चिम बंगालच्या पृथ्वी भट्टाचार्याने रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्रातील विजेत्यांची भेट घेत पथकप्रमुख नवनाथ फडतरे आणि क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

घोघला समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या पारंपारिक पिंच्याक सिलॅट प्रकारात महाराष्ट्राच्या रिया चव्हाण व प्राजक्ता जाधव या जोडीने सुवर्णपदकाला गवसणी घातली, या पदकाने महाराष्ट्राचे सुवर्णपदकाचे खाते उघडले. ५५५ गुणांची कमाई करीत रिया-प्रातक्ता जोडीने गंडा प्रकारात सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन घडवले. मणिपूरने ५५२ गुणांसह रौप्य, तर कर्नाटकने ५४२ गुणांसह कांस्यपदकांवर नाव कोरले. एकेरीत महाराष्ट्राच्या किर्णाक्षी येवलेने कांस्यपदकाची कमाई केली आहे.
बीच सेपक टकरा स्पर्धेतील दुसऱ्या लढतीत महाराष्ट्राला विजय गवसला. महाराष्ट्राने राज्यस्थानला २-० असे सरळ सेटमध्ये पराभूत करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. कबड्डी मैदानातही महाराष्ट्राचा जयजयकार घुमला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी यजमान दीम दमणला पराभूत केले. महिला संघाने दीव संघाचा ८०-११ गुणांनी धुव्वा उडविला, तर पुरूष संघाने दीव संघावर ७३-३६ गुणांनी दणदणीत विजय संपादन केला.
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी २ सुवर्ण, २ रौप्य आणि ५ कांस्य पदके जिंकून महाराष्ट्र पदकतक्यात तिसऱ्या स्थानावर आहे. यजमान दीव-दमण ३ सुवर्णांसह एकूण ४ पदकांसह अव्वल स्थानी आहे.