
एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच असा पराक्रम
डब्लिन ः डब्लिनमधील द व्हिलेज क्रिकेट ग्राउंडवर एकदिवसीय सामन्यात आयर्लंड संघाने वेस्ट इंडिज संघाचा तब्बल १२४ धावांनी पराभव करून इतिहास रचला आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर आयर्लंड संघाने ६ गडी गमावून ३०३ अशी भक्कम धावसंख्या उभारली. वेस्ट इंडिजला विजयासाठी ३०४ धावांचे लक्ष्य दिले. पण प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिज संघ २०० धावांचा टप्पाही ओलांडू शकला नाही आणि ३४.१ षटकांत १७९ धावांवर सर्वबाद झाला. बॅरी मॅकार्थी आणि जॉर्ज डॉकरेल यांच्या घातक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा डाव गडगडला. सात कॅरिबियन खेळाडूंना दुहेरी अंकही ओलांडता आला नाही.
आयर्लंडचा हा पहिला मोठा विजय
एकदिवसीय इतिहासात आयर्लंडने पूर्ण सदस्य देशाविरुद्ध १०० किंवा त्याहून अधिक धावांनी सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयर्लंडला हे कधीच करता आले नाही. हा आयर्लंडचा चौथा सर्वात मोठा विजय आहे.
धावांच्या बाबतीत आयर्लंडचा सर्वात मोठा एकदिवसीय विजय युएईविरुद्ध होता, जेव्हा त्यांनी २०१८ मध्ये २२६ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. तर दुसरा सर्वात मोठा विजय देखील युएईविरुद्ध होता. २०२३ मध्ये त्यांनी युएईचा १३८ धावांनी पराभव केला. तर २०११ मध्ये आयर्लंड संघाने कॅनेडियन संघाचा १३३ धावांनी पराभव केला होता. हा आयर्लंडचा तिसरा सर्वात मोठा विजय आहे.
आयर्लंडचा पूर्ण सदस्य देशाविरुद्धचा सर्वात मोठा विजय २००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध ७४ धावांनी जिंकला होता. आयर्लंडच्या एकदिवसीय इतिहासात हा सहावाच विजय होता जेव्हा संघ १०० किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने जिंकण्यात यशस्वी झाला.