
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना व लायन्स सेन्ट्रल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने खुली रॅपिड व ब्लीट्झ जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन रविवारी (२५ मे) येथील सुहास किंडरगार्टेन, जालना रोड येथे करण्यात आले आहे.
बुद्धिबळातील लोकप्रिय असलेल्या या रॅपिड (जलद) व ब्लिट्झ (अतिजलद) प्रकारातील जिल्हा निवड चाचणी स्पर्धा स्वतंत्र गटात होणार असून दोन्ही गटातील विजेते खेळाडूंची निवड आगामी पालघर, मुंबई येथे आयोजित राज्य रॅपिड व ब्लिट्झ अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येईल.
या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण रोख अकरा हजार रूपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. शिवाय लहान गटात शालेय उपयोगी भेटवस्तू बक्षिस स्वरूपात ठेवण्यात आली आहे. स्पर्धकांनी स्पर्धा स्थळी २५ मे रोजी सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे. प्रवेश शुल्क रॅपिड स्पर्धा ३०० रुपये असून स्पर्धकांनी आपापले बुद्धिबळ संच सोबत आणावेत असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी हेमेंद्र पटेल (९३२५२२८२६१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लायन्स क्लब सेन्ट्रलचे अध्यक्ष संतोष गांधी, प्रोजेक्ट चेअरमन राहुल संचेती, दीपक संचेती, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल यांनी केले आहे.