
मलेशिया मास्टर्स
क्वालालंपूर ः भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने गुरुवारी दुसऱ्या फेरीच्या सामन्यात आयर्लंडच्या न्हाट न्गुयेनला पराभूत करून मलेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
श्रीकांतने ५९ मिनिटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत ३३ व्या स्थानावर असलेल्या गुयेनविरुद्ध २३-२१, २१-१७ असा विजय मिळवला. शेवटच्या आठ सामन्यात श्रीकांतचा सामना फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हशी होईल. पोपोव्हने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात भारताच्या आयुष शेट्टीला २१-१३, २१-१७ असे हरवले.
त्याच वेळी, सतीश करुणाकरन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सतीश याला क्रिस्टो पोपोव्हकडून १४-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. दुहेरीत, तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांनी ली पालेर्मो आणि ज्युलियन मायो या फ्रेंच जोडीवर २१-१७, १८-२१, २१-१५ असा विजय मिळवत मिश्र प्रकाराच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता त्यांचा सामना जियांग जेन बँग आणि वेई या शिन या चिनी जोडीशी होईल.
प्रणॉयने यापूर्वी एक तास २२ मिनिटे चाललेल्या चुरशीच्या सामन्यात पाचव्या मानांकित जपानच्या केंटा निशिमोटोचा १९-२१, २१-१७, २१-१६ असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यानंतर करुणाकरनने तिसऱ्या मानांकित चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन चेनचा फक्त ३९ मिनिटांत २१-१३, २१-१४ असा पराभव केला. आणखी एक भारतीय पुरुष खेळाडू आयुष शेट्टीनेही पुढील फेरी गाठण्यात यश मिळवले. आयुष याने कॅनडाच्या ब्रायन यांगचा २०-२२, २१-१०, २१-८ असा पराभव केला.
सिंधूचा खराब फॉर्म कायम
पुरुष एकेरी गटात भारतासाठी चांगला दिवस असला तरी महिला गटात सिंधूचा खराब फॉर्म कायम राहिला आणि तिला या सुपर ५०० स्पर्धेची सुरुवातीची फेरी ओलांडता आली नाही. सिंधूला व्हिएतनामच्या गुयेन थ्यू लिंथविरुद्ध ११-२१, २१-१४, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला.