
आयुष म्हात्रे कर्णधारपदी, वैभव सूर्यवंशीचा भारतीय संघात समावेश
मुंबई ः इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर १९ संघाची घोषणा करण्यात आली. सीएसके संघाचा युवा स्टार फलंदाज आयुष म्हात्रे याची कर्णधारपदी निवड करण्यात आली. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. या दौऱयात भारतीय संघ पाच एकदिवसीय सामने आणि दोन चार दिवसीय सामने खेळणार आहे.
इंग्लंड दौऱ्यात भारतीय अंडर १९ संघ एकूण आठ सामने खेळेल. यामध्ये इंग्लंड अंडर १९ संघाविरुद्ध एक सराव सामना, पाच एकदिवसीय सामने आणि दोन बहु-दिवसीय सामने समाविष्ट आहेत. ही मालिका २४ जूनपासून सुरू होईल. भारतीय अंडर १९ संघाची कमान चेन्नई सुपर किंग्जचा सुपरस्टार युवा फलंदाज आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आली आहे. त्याच वेळी, १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीलाही या संघात स्थान मिळाले आहे. या दोघांनीही या हंगामात आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. वैभवने तर शतक झळकावले आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित साकिया यांची घोषणा
बीसीसीआयने गुरुवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे संघाची घोषणा केली. बीसीसीआयने म्हटले आहे की, ‘ज्युनियर क्रिकेट समितीने २४ जून ते २३ जुलै दरम्यान होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या १९ वर्षांखालील संघाची निवड केली आहे. या दौऱ्यात ५० षटकांचा सराव सामना, त्यानंतर पाच सामन्यांची युवा एकदिवसीय मालिका आणि इंग्लंड अंडर-१९ संघाविरुद्ध दोन बहु-दिवसीय सामने खेळवले जातील. आयुष म्हात्रे यांच्या जागी मुंबईचा यष्टीरक्षक-फलंदाज अभिज्ञान कुंडूला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
वैभवसाठी आयपीएल हा एक उत्तम काळ
राजस्थान रॉयल्ससोबतच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामात शानदार कामगिरी केल्यानंतर वैभवची निवड झाली आहे. बिहारमधील समस्तीपूर येथील या तरुण खेळाडूने आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू बनून संपूर्ण देशाची मने जिंकली होती. गेल्या महिन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने ३५ चेंडूत शतक झळकावले, जे लीगमधील दुसरे सर्वात जलद शतक होते. त्याने बिहारसाठी पाच प्रथम श्रेणी सामने आणि सहा लिस्ट ए सामने खेळले आहेत पण त्यापैकी एकाही सामन्यात त्याने शतक झळकावले नाही. गेल्या वर्षी चेन्नई येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्धच्या पहिल्या युवा कसोटीत वैभवने शतक झळकावले होते.
केरळच्या लेग स्पिनर अन्नानलाही स्थान मिळाले
दुसरीकडे, १७ वर्षीय म्हात्रेने नऊ प्रथम श्रेणी सामने आणि सात लिस्ट ए सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ९६२ धावा केल्या आहेत. कोपराच्या दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर हंगामाच्या मध्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची जागा या सलामीवीराने घेतली होती. आणखी एक मनोरंजक निवड म्हणजे केरळचा लेगस्पिनर मोहम्मद अन्नान ज्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्ध प्रभावी कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या दोन युवा कसोटी सामन्यांमध्ये अन्नानने १६ विकेट्स घेतल्या आणि त्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. पंजाबचा ऑफस्पिनर अनमोलजीत सिंगलाही संघात स्थान मिळाले आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा अंडर १९ संघ
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंग चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार), हरवंश सिंग, आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलान पटेल, हेनिल पटेल, युधाजीत गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद एनान, आदित्य राणा, अनमोलजीत सिंग.
स्टँडबाय खेळाडू: नमन पुष्पक, डी दिपेश, वेदांत त्रिवेदी, विकल्प तिवारी, अलंकृत रापोल.