सौरभ तिवारी, रुद्र निस्ताने, संस्कृती पळसपगार, प्रेरित ताथेड अव्वल

  • By admin
  • May 22, 2025
  • 0
  • 123 Views
Spread the love

चांदुरबाजार येथे राज्यस्तरीय ग्रीन रन मॅरेथॉन उत्साहात संपन्न

अमरावती ः चांदुरबाजार येथे राज्यस्तरीय ग्रीन रन मॅरेथॉन उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत सौरभ तिवारी, रुद्र निस्ताने, संस्कृती पळसपगार, प्रेरित ताथेड यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

स्वराज्यवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंती पर्वावर आणि ९३ वृक्षांना श्रद्धांजली म्हणून संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी, जी एस टोम्पे महाविद्यालय, तालुका डॉक्टर्स असोसिएशन व तालुका शारीरिक शिक्षक संघटना यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय ग्रीन रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या राज्यस्तरीय स्पर्धेत खुल्या गटात सौरभ तिवारी (नागपूर) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय नागराज खुरसुने, तृतीय क्रमांक पियुष मसाने (नागपूर) यांनी पटकावला. प्रोत्साहनपर पारितोषिक डॉ आर के देशमुख व आनंद हिवराळे गुरुजी यांना देण्यात आले.

१४ वर्षांखालील गटात रुद्र निस्ताने, सोहम जाधव,अनुज दळवी यांनी यश संपादन केले. मुलींच्या गटात संस्कृती पळसपगार, कार्तिकी धरपाळ, श्रावणी भटकर यांनी यश मिळवले. डॉक्टर्स गटात डॉ प्रेरित ताथेड, डॉ निलेश तिरमारे, डॉ सैफी यांनी यश मिळवले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ राजेंद्र रामटेके हे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ नितीन चवाळे, डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ मुकुंद मोहोड, डॉ हेमंत रावळे, शारीरिक शिक्षक संघटनेचे डी आर नांदुरकर, पंकज उईके, बबलू देशमुख, ज्येष्ठ पत्रकार मदन भाटे, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश संघटिका प्रा मनाली तायडे, स्पर्धेचे संयोजक डॉ तुषार देशमुख, मनीष नागले, प्रवीण पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडा शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे तालुक्यातील राष्ट्रीय खेळाडू यांचाही सन्मान करण्यात आला. चांदुर बाजार येथील युवा पत्रकार सागर सवळे व क्रीडा पत्रकार सुयोग गोरले यांचाही सत्कार आयोजन समितीने केला. बच्चूभाऊ कडू यांनी आयोजन समितीचे कौतुक केले व अशा आयोजनाला सदैव मदत करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ तुषार देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन निखिल काटोलकर यांनी केले. पंकज उईके यांनी आभार मानले. मॅरेथॉनच्या यशस्वीतेसाठी पोलीस प्रशासन, परिवहन महामंडळ, तालुका शारीरिक शिक्षक संघटना, शिवाजीयंस क्लब, जगदंब क्लब, माऊली स्पोर्ट, शेषस्मृती क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *