मिचेल मार्शच्या वादळी शतकाने गुजरात संघ ३३ धावांनी पराभूत 

  • By admin
  • May 22, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

अव्वल स्थानावर असलेल्या गुजरातला लखनौ सुपर जायंट्स संघाचा मोठा धक्का 

अहमदाबाद : मिचेल मार्शच्या वादळी शतकाच्या बळावर लखनौ सुपरजायंट्स संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवत गुजरात टायटन्स संघाला पराभवाचा धक्का दिला. आयपीएल गुणतालिकेत १८ गुणांसह अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात संघाला घरच्या मैदानावर ३३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात संघाचा हा चौथा पराभव ठरला तर लखनौ संघाचा सहा विजय ठरला. 

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघासमोर विजयासाठी २३६ असे मोठे आव्हान होते. पाचव्या षटकात गुजरात संघाला पहिला धक्का बसला. विल्यम ओरोर्क याने साई सुदर्शन याची आक्रमक खेळी २१ धावांवर संपुष्टात आणत संघाला मोठे यश मिळवून दिले. सुदर्शन याने १६ चेंडूंचा सामना करताना चार चौकार मारले. सुदर्शन व शुभमन गिल या जोडीने ४६ धावांची भागीदारी केली. 

सुदर्शन बाद झाल्यानंतर शुभमन गिल ८व्या षटकात तंबूत परतला. शुभमन गिल याने सुरेख फटकेबाजी केली. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात गिल ३५ धावांवर बाद झाला. त्याने २० चेंडूत सात चौकार मारले. जोस बटलरची आक्रमक खेळी ३३ धावांवर संपुष्टात आली. बटलर  याने १८ चेंडूंचा सामना करताना तीन चौकार व दोन षटकार मारले. ९.३ षटकात गुजरात संघाचे तीन धमाकेदार फलंदाज तंबूत परतले होते. त्यावेळी धावसंख्या तीन बाद ९६ अशी बिकट होती. 

शेरफेन रदरफोर्ड आणि शाहरूख खान या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी वेगवान ८६ धावांची भागीदारी करुन सामन्याचे चित्र बदलले. या जोडीने जबरदस्त फटकेबाजी करत सामन्यातील रोमांच वाढवला. ही जोडी धोकादायक बनली असताना वेगवान गोलंदाज विल्यम ओरोर्क याने रदरफोर्डची बहारदार खेळी ३८ धावांवर संपुष्टात आणली. त्याने २२ चेंडूत तीन षटकार व एक चौकार ठोकत ३८ धावांचे योगदान दिले. रवी बिश्नोई याने सुरेख झेल टिपला. 

शाहरूख खान याने २२ चेंडूत अर्धशतक साजरे केले. शाहरुख खानची तुफानी अर्धशतकी खेळी लक्षवेधक ठरली. १९व्या षटकात आवेश खान याने शाहरूखला बाद करुन गुजरातची विजयाची शक्यता संपुष्टात आणली. शाहरूखने २९ चेंडूत ५७ धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार व तीन षटकार मारले.गुजरात संघ २० षटकात नऊ बाद २०२ धावा काढू शकला. विल्यम ओरोर्के (३-२७), आवेश खान (२-५१), आयुष बदोनी (२-४) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

मिचेल मार्शचे वादळी शतक

 गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार शुभमन गिल याचा हा निर्णय चांगलाच महागात पडला. कारण लखनौ सुपरजायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना धमाकेदार फटकेबाजी करत २० षटकात दोन बाद २३५ अशी भक्कम धावसंख्या उभारली. लखनौ संघाची ही आयपीएल स्पर्धेतील तिसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. 

एडन मार्कराम आणि मिचेल मार्श या सलामी जोडीने डावाची सुरुवात बहारदार केली. या सलामी जोडीने आक्रमक फटकेबाजी करत ९.५ षटकात ९१ धावांची भागीदारी केली. साई किशोरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मार्कराम ३६ धावांवर बाद झाला. त्याने २४ चेंडूत तीन चौकार व दोन षटकार मारले. 

मिचेल मार्श आणि निकोलस पूरन या जोडीने वादळी फलंदाजी करण्यास सुरुवात केली. प्रत्येक गोलंदाजांवर ही जोडी तुटून पडत होती. मार्श व पूरन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी करत संघाची स्थिती भक्कम केली. १९व्या षटकात मिचेल मार्शची वादळी शतकी खेळी ११७ धावांवर संपुष्टात आली. मार्श याने अवघ्या ६४ चेंडूंचा सामना करताना १० चौकार व ८ टोलेजंग षटकार ठोकत शतक साजरे केले. निकोलस पूरन याने २७ चेंडूत नाबाद ५६ धावा फटकावत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. पूरन याने चार चौकार व पाच उत्तुंग षटकार ठोकून मैदान दणाणून सोडले. कर्णधार ऋषभ पंत याने ६ चेंडूत नाबाद १६ धावाफटकावल्या. पंत याने दोन टोलेजंग षटकार ठोकले. 

गुजरात संघाकडून अर्शद खान (१-३६) व साई किशोर (१-३४) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *