
२० हजार रुपयांची पारितोषिके
सोलापूर ः महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन व हेरिटेज समुहाच्या सहकार्याने सोलापूर चेस अकॅडमीने अंडर ९ ओपन व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे.
ही स्पर्धा २६ व २७ मे या कालावधीत हेरिटेज गांधीनगर येथे होणार आहे. जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या स्विस लीग नियमानुसार एकूण आठ फेऱ्यांमध्ये स्पर्धा संपन्न होणार असून खेळाडूंना प्रत्येकी ३० मिनिटे व प्रत्येक चालीला ३० सेकंद वाढीव वेळ देण्यात येणार आहे. या स्पर्धेत १ जानेवारी २०१६ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले खेळाडू सहभाग घेऊ शकतात. सदर स्पर्धेतून दोन मुले व दोन मुलींची निवड राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना २० हजार रकमेची रोख पारितोषिके व आकर्षक चषक व मेडल्स देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंना राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे. जिल्हा पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंची राहण्याची मोफत सोय अकॅडमीकडून केली जाणार असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील नवोदित बिगरमानांकित बुद्धिबळ खेळाडूंसह आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू यांचा सहभाग निश्चित झाल्याची माहिती संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड यांनी सांगितली आहे.
इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे (8888045344) यांच्याकडे संपर्क साधावा, असे अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर यांनी कळविले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घेण्याचे आवाहन सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील, हेरिटेज समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज शहा, सहसंचालक अमृता मखिजा, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे निरंजन गोडबोले आदींनी केले आहे.