
नाशिक ः नाशिक येथे आयोजित धर्मवीर संभाजी महाराज चषक ओपन फुटसाल स्पर्धेत गुरू फुटबॉल क्लब, यंग लायन फुटबॉल क्लब या संघांनी विजेतेपद पटकावले.
फुटसाल असोसिएशन नाशिक, मराठा सेवा संघ, उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि रामभूमी बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने तारवाला नगर येथील राजमाता जिजाऊ क्रीडांगण येथे १२ वर्षे आणि १५ वर्षे वयोगटाच्या मुलांसाठी राज्यस्तरीय फुटसाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फुटसाल हा फुटबॉलचाच प्रकार असून हा इनडोअर स्टेडियममध्ये छोट्या मैदानात खेळला जातो. फुटबॉलच्या जास्तीत जास्त खेळाडूंना संधी मिळावी आणि या माध्यमातून खेळाडूंची प्रगती व्हावी, त्यांना खेळतांना लागणाऱ्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत १२ वर्षे गटामध्ये १७ संघ तर १५ वर्षे गटामध्ये १६ संघ सहभागी झाले होते. १२ वर्षे गटामध्ये गुरू फुटबॉल क्लबने अंतिम लढतीत अचिव्हर्स फुटबॉल क्लबचा ४-२ असा दोन गोलने पराभव करून या स्पर्धचे विजेतेपद आपल्या नावे केले. १५ वर्षे गटामध्ये अंतिम सामना अटीतटीचा झाला. पुण्याच्या यंग लायन फुटबॉल क्लब आणि नाशिकच्या के आर फुटबॉल क्लब यांच्यात झालेल्या या अंतिम सामन्यात मध्यंतराला के आर फुटबॉल क्लबने सुंदर खेळ करत ३-१ अशी आघाडी प्रस्थापित केली. मात्र उत्तरार्धात पुण्याच्या यंग लायन फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनी चांगला समन्वय साधून पहिल्या पाच मिनिटात दोन गोल करून ४-४ अशी बरोबरी साधली. त्यांनतर ५-५ अशा बरोबरीनंतर शेवटच्या एक मिनिटात यंग लायन फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनी एक गोल करून हा सामना ६-५ असा जिंकून या गटाचे विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेमध्ये दोन्हीही गटामध्ये प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या संघाला आकर्षक चषक आणि रोख एकवीस हजार रुपये, उपविजेत्या संघांना चषक आणि रोख अकरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या संघांना चषक आणि रोख सात हजार रुपये अशी पारितोषिके प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या विजयी संघांना लाख मराठा प्रतिष्ठानचे कार्याधक्ष अशोक कदम, फुटसाल असोसिएशन ऑफ नाशिकचे सचिव दीपक निकम यांच्या हस्ते आकर्षक चषक आणि रोख पारितोषिके प्रदान करून सन्मानित कारणात आले.
यावेळी फुटसाल असोसिएशन ऑफ नाशिच्या खजिनदार ज्योती निकम, शिनु जोस, हर्षल वाणी, किशोर वाणी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अविनाश वाघ, शैलेश रकीबे, सतीश बोरा, शशी सिंग, अंकुश सिंग, महेंद्र साळवे, नीरज राजभर, ऋषिकेश रसाळ,हार्दिक पवार,आशिष कुंभार यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
१२ वर्षांखालील मुले ः १. गुरू फुटबॉल क्लब, देवळाली, २. अचिव्हर्स फुटबॉल क्लब, सातपूर, ३. वीरा फुटबॉल क्लब, नाशिक. उत्कृष्ट खेळाडू – तन्वीष सूर्यवंशी, अचिव्हर्स फुटबॉल क्लब.
१५ वर्षातील मुले ः १. यंग लायन फुटबॉल क्लब, पुणे, २. के आर फुटबॉल क्लब, नाशिक, ३. गोट फुटबॉल क्लब, नाशिक रोड. उत्कृष्ट खेळाडू – रोया राठोड, यंग लायन फुटबॉल क्लब पुणे.