टीआरपीपेक्षा लोकांचे जीवन महत्त्वाचे ः गौतम गंभीर

  • By admin
  • May 23, 2025
  • 0
  • 2 Views
Spread the love

नवी दिल्ली ः ‘टीआरपीपेक्षा आपल्या लोकांचे जीवन महत्त्वाचे आहे…’ असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांशी संबंधित प्रश्नावर त्यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले की, या दोघांमधील खेळामुळे टीआरपी मिळत असला आणि जाहिरात एजन्सींना फायदा होत असला तरी, आपल्या देशातील लोकांची सुरक्षा त्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. यावेळी गंभीरने पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबद्दल सांगितले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने ७ मे रोजी पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील अनेक दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला होता. यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते. एवढेच नाही तर पाकिस्तानी सैन्याचे नऊ हवाई तळही उद्ध्वस्त करण्यात आले.

गंभीरने आपले स्पष्ट मत व्यक्त केले
पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याबद्दल संपूर्ण देशात अजूनही संताप आहे. क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी भारत आणि पाकिस्तानमधील क्रीडा संबंध संपुष्टात आणण्याची मागणी केली. आता माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीरनेही यावर भाष्य केले. गुरुवारी गोवा फेस्ट कार्यक्रमात, जेव्हा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकांना भारत-पाकिस्तान सामन्यातील टीआरपी आणि जाहिरात एजन्सींना होणाऱ्या फायद्यांविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्याचे स्पष्ट उत्तर दिले. गौतम गंभीर म्हणाले की, ‘या देशात आपल्या लोकांच्या आणि सैनिकांच्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. आपले रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस सीमेवर उभे राहणाऱ्या आपल्या सैनिकांपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही.

पाकिस्तानसोबत क्रीडा संबंध संपुष्टात आणण्याबाबत गौतम गंभीरने आपले मत व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पहलगाम हल्ल्यानंतर गंभीरने कडक भूमिका घेत म्हटले होते की, भारताने आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांमध्येही पाकिस्तानसोबत खेळू नये. भारतीय मुख्य प्रशिक्षक म्हणतात की दहशतवादाचे उच्चाटन होईपर्यंत राष्ट्रीय संघाने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी विरुद्ध कोणत्याही स्तरावर खेळू नये.

गंभीर म्हणाले की, ‘आपण खेळायचे की नाही, हा पूर्णपणे सरकारचा निर्णय आहे. मी आधीही सांगितले आहे की कोणताही क्रिकेट सामना, बॉलिवूड किंवा इतर कोणताही कार्यक्रम भारतीय सैनिक आणि जनतेच्या जीवापेक्षा महत्त्वाचा नाही. सामने होत राहतील, चित्रपट बनत राहतील आणि गायक सादरीकरण करत राहतील, पण तुमच्या कुटुंबातील प्रिय व्यक्ती गमावण्यापेक्षा जास्त वेदनादायक काहीही नाही.

द्विपक्षीय मालिका बऱ्याच काळापासून बंद
गेल्या दशकाहून अधिक काळ भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका झालेली नाही. त्याच वेळी, २००७ पासून भारताने पाकिस्तानमध्ये कोणतीही मालिका खेळलेली नाही. दोन्ही संघ आतापर्यंत फक्त बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळतात आणि गंभीर म्हणतो की भारतीय संघाने अशा स्पर्धांमध्येही पाकिस्तान सोबत खेळू नये. गंभीर म्हणाले की, ‘माझे वैयक्तिक मत असे आहे की आपण पाकिस्तानसोबत खेळू नये. जोपर्यंत सीमेपलीकडून होणारा दहशतवाद संपत नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये काहीही घडू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *