
कराची ः पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) स्पर्धेचे उर्वरित सामने हॉक आय आणि डीआरएस तंत्रज्ञानाशिवाय होत आहेत. खरंतर, भारत-पाकिस्तान तणावामुळे पीएसएल ७ मे रोजी पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर, १७ मे रोजी लीग पुन्हा सुरू झाली आणि उर्वरित आठ सामने खेळवले जात आहेत. आठ पैकी सहा सामने खेळले गेले आहेत आणि हे सर्व सामने हॉक आय आणि डीआरएसशिवाय खेळले गेले आहेत.
पीएसएलमध्ये या दोन्ही तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही कारण त्यातील बहुतेक तंत्रज्ञ भारतातील आहेत आणि दोन्ही देशांमधील अलिकडच्या लष्करी संघर्षानंतर ते परतले नाहीत आणि पाकिस्तान आता शुद्धीवर आला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर पीएसएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. पीसीबीने उर्वरित पीएसएल सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्याचा प्रयत्न केला, परंतु अमिराती क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) हा प्रस्ताव स्वीकारला नाही. यानंतर, पीएसएलचा १० वा टप्पा पूर्ण करण्यात पीसीबीसमोर आव्हाने आहेत.
डीआरएस आणि हॉक आय टीम परतली नाही
एका फ्रँचायझीच्या विश्वसनीय सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘हॉक आय आणि डीआरएस तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन आणि संचालन करणारी टीम पाकिस्तानला परतलेली नाही. याचा अर्थ असा की पीएसएलचे उर्वरित काही सामने आता कोणत्याही डीआरएसशिवाय पूर्ण होतील जे बोर्ड आणि संघांसाठी एक मोठा धक्का आहे. याचा पीएसएलच्या प्रेक्षकांवरही मोठा परिणाम झाला आहे.
पीएसएलचा अंतिम सामना २५ मे रोजी
बाकी राहिलेल्या आठ सामन्यांमध्ये चार लीग फेरीचे सामने आणि चार प्लेऑफ सामने समाविष्ट आहेत. क्वालिफायर-१ मध्ये, सौद शकीलच्या क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाने शादाब खानच्या इस्लामाबाद युनायटेडला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. यानंतर, शाहीन आफ्रिदीच्या लाहोर कलंदर्सने एलिमिनेटरमध्ये मोहम्मद रिझवानच्या कराची किंग्जचा पराभव केला.