
क्रीडा संघटनांना ५१ लाखांऐवजी ९० लाख रुपये मिळणार
नवी दिल्ली ः २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकची तयारी लक्षात घेऊन क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा महासंघांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ केली आहे. क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी देशात कोणत्याही आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी मंत्रालयाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत दुप्पट केली आहे.

क्रीडा मंत्री मांडवीय म्हणाले की, आता आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी एक कोटी ऐवजी २ कोटी रुपये आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी ५१ लाखांऐवजी ९० लाख रुपये दिले जातील. एवढेच नाही तर मंत्रालयाने खेळाडूंचा जेवण भत्ता दररोज १,००० रुपये केला आहे. पूर्वी ते ६९० रुपये होते. ज्युनियर खेळाडूंना ४८० रुपयांऐवजी ८५० रुपये प्रतिदिन दराने जेवण दिले जाईल. याशिवाय, खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचे पगारही वाढवण्यात आले आहेत. आता भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाला ५ लाख रुपयांऐवजी ७.५ लाख रुपये दरमहा वेतन मिळेल, तर इतर प्रशिक्षकांना २ लाख रुपयांऐवजी ३ लाख रुपये दरमहा वेतन मिळेल.
२० टक्के रक्कम तरुणांवर खर्च करावी लागेल
क्रीडा मंत्री मांडविया यांच्या मते, उच्च प्राधान्य असलेल्या खेळांच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी ९० लाख रुपये आणि प्राधान्य असलेल्या खेळांसाठी ७५ लाख रुपये दिले जातील. क्रीडा संघटनांना आता त्यांच्या वार्षिक बजेटच्या २० टक्के रक्कम तळागाळातील क्रीडा विकासासाठी बाजूला ठेवावी लागेल. क्रीडा संघटनेला ही रक्कम ज्युनियर आणि युवा खेळाडूंच्या विकासावर खर्च करावी लागेल. या खेळाडूंना मान्यताप्राप्त अकादमींमध्ये प्रशिक्षण दिले जाईल, ज्यांचे निरीक्षण उच्च कामगिरी संचालक (एचपीडी) करतील. १० कोटी रुपयांचे वार्षिक बजेट असलेल्या क्रीडा संघटनांना एचपीडी असणे अनिवार्य असेल.
१३ खेळांमध्ये लीग सुरू होईल
क्रीडामंत्र्यांनी सांगितले की, सरकार देशात लीग संस्कृती विकसित करणार आहे. याअंतर्गत, १३ खेळांमध्ये लीग सुरू करण्याची योजना आहे. या लीग फ्रँचायझी आधारित असतील आणि कॉर्पोरेट घराण्या त्यांच्याशी जोडल्या जातील. नेमबाजी, योगा, कबड्डी आणि हॉकीमध्ये लीग सुरू होत आहेत. त्यानंतर सायकलिंग आणि रग्बी या खेळात लीग होतील. क्रीडा मंत्री मांडवीय यांच्या मते, लवकरच बास्केटबॉल, बॅडमिंटन, तिरंदाजी, बॉक्सिंग, कुस्ती, जलक्रीडा आणि पोलो या खेळांमध्ये लीग सुरू होतील.