
दीव (गणेश माळवे) ः खेलो इंडिया आणि दीव दमन दादर नगर हवेली सरकारच्या वतीने आयोजित पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ पुरुष व महिला गटात कांस्यपदक विजेता ठरला.
महिला गटात उपांत्य फेरीत सामन्यात हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यात कडवी झुंज झाली. यात हिमाचल प्रदेश संघाने ५१-४१ असा सामना जिंकला. महाराष्ट्र संघ १० गुणांनी पराभूत झाला आणि कांस्यपदक पटकावले.
महिला गटात महाराष्ट्र संघाने साखळी सामन्यात छत्तीसगड, दीव दमन या संघांचा मोठ्या गुण फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत गाठली होती. गार्गी साखरे, हर्षा शेट्टी तसेच उत्कृष्ट डावा व उजवा कोपरा रक्षक जुली मिस्कीटा व समृद्धी मोहिते व तेजा सपकाळ व साक्षी सावंत यांनी शानदार कामगिरी नोंदवली. या संघास प्रशिक्षक विद्या शिरस यांचे मार्गदर्शन लाभले.
पुरुष गटात उपांत्य फेरीत हरियाणा संघाने महाराष्ट्र संघाचा ५२-२७ असा २५ गुणांनी पराभव केला. त्यामुळे महाराष्ट्र संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. साखळी सामन्यात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा ६२-३५ असा तर दीव दमन संघाचा ८२-२५ असा पराभव करुन उपांत्य फेरीत गाठली होती.
पुरुष गटात सौरभ राऊत, साईल पाटील, सुरेश जाधव, अमन शेख, समीर हिरवे, आकाश अरसेसुळ यांनी सुरेख कामगिरी बजावली. या संघाला प्रशिक्षक निलेश कलेबेरे यांचे मार्गदर्शन लाभले.
या शानदार यशाबद्दल क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे, महाराष्ट्र राज्य पथक प्रमुख क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, राज्य सरचिटणीस बाबूराव चांदरे, राज्य कोषाध्यक्ष मंगल पांडे, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, शंकर भास्करे, नेहा साप्ते, अनिता कदम, गणेश माळवे, दर्शन हस्ती यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.