
क्लालालंपूर ः भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतची उत्कृष्ट कामगिरी सुरूच असून त्याने मलेशिया मास्टर्समध्ये पुरुष एकेरी प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
श्रीकांतने तीन सामन्यांमध्ये आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हला पराभूत करून अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले. ६५ व्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतने क्वार्टर फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत १८ व्या क्रमांकावर असलेल्या पोपोव्हला कडक लढत दिली आणि एक तास १४ मिनिटांत त्याला २४-२२, १७-२१, २२-२० असे पराभूत केले.
तनाकाशी सामना करेल
श्रीकांत आता उपांत्य फेरीत जपानच्या युशी तनाकाशी सामना करेल. माजी नंबर वन खेळाडू श्रीकांतने गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांत हा जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेता आहे आणि आता त्याला तनाकाकडून कठीण आव्हान मिळेल. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तनाका याने क्रिस्टो पोपोव्हचा २१-१८, १६-२१, २१-६ असा पराभव केला.