हैदराबाद संघाचा आरसीबी संघाला पराभवाचा धक्का

  • By admin
  • May 23, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

सनरायझर्स ४२ धावांनी विजयी, इशान किशनची नाबाद ९४ धावांची खेळी निर्णायक

लखनौ : इशान किशनच्या स्फोटक नाबाद ९४ धावांच्या खेळीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने आरसीबी संघाचा ४२ धावांनी पराभव केला. आयपीएल स्पर्धेतील आरसीबी संघाचा हा चौथा पराभव ठरला. या पराभवानंतरही आरसीबी संघ १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या विजयानंतर हैदराबाद संघाच्या स्थितीत कोणताही बदल झाला नाही.

आरसीबी संघासमोर विजयासाठी २३२ धावांचे आव्हान होते. अनुभवी विराट कोहली आणि फिलिप सॉल्ट या जोडीने आक्रमक सुरुवात करुन ८० धावांची वेगवान भागीदारी केली. सातव्या षटकात कोहली ४३ धावांवर बाद झाला. कोहलीने २५ चेंडूत सात चौकार व एक षटकार मारला. हर्ष दुबे याने कोहलीची विकेट काढली. त्यानंतर मयंक अगरवाल अवघ्या ११ धावांवर तंबूत परतला. १२० धावसंख्येवर आरसीबीला दुसरा धक्का बसला. नितीन रेड्डीने त्याचा बळी घेतला.

फिलिप सॉल्ट याने दमदार फलंदाजी करत वादळी अर्धशतक साजरे केले. कमिन्स याने सॉल्टची दमदार खेळी ६२ धावांवर संपुष्टात आणली. त्याने ३२ चेंडूत चार चौकार व पाच उत्तुंग षटकार मारले. १६व्या षटकात रजत पाटीदार (१८) व शेफर्ड (०) हे बाद झाले आणि आरसीबी (५ बाद १७४) संघाच्या विजयाची शक्यता धुसर बनली. त्यानंतर लगेचच कर्णधार जितेश शर्मा (२४) हा उनाडकटचा बळी ठरला. कृणाल पंड्या (८), टिम डेव्हिड (१), भुवनेश्वर कुमार (३), यश दयाल (३) हे तळाचे फलंदाज झटपट बाद झाले. आरसीबी संघाचा डाव १९.५ षटकात १८९ धावांवर सर्वबाद झाला आणि आरसीबी संघाला ४२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कमिन्स याने २८ धावांत तीन विकेट घेतल्या तर इशान मलिंगा याने ३७ धावांत दोन बळी घेतले.

इशान किशनची स्फोटक फलंदाजी

इशान किशनच्या शानदार आणि स्फोटक फलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आरसीबीसमोर २३२ धावांचे लक्ष्य ठेवले. इशानने ४८ चेंडूत सात चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ९४ धावा केल्या. त्यामुळे सनरायझर्स संघ २० षटकांत सहा गडी बाद २३१ धावा करण्यात यशस्वी झाला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करत त्यांना जलद सुरुवात दिली.

१७ चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांसह ३४ धावा करणाऱ्या अभिषेकला बाद करून लुंगी एनगिडी याने ही भागीदारी मोडली. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने ट्रॅव्हिस हेडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले ज्याने १० चेंडूत तीन चौकारांसह १७ धावा केल्या. यानंतर, हेनरिक क्लासेन आणि इशान किशन यांनी जबाबदारी स्वीकारली आणि तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. सुयश शर्माने क्लासेनला बाद करून ही भागीदारी मोडली, ज्याने १३ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह २४ धावा केल्या.

यानंतर, अनिकेत वर्मा ईशानला पाठिंबा देण्यासाठी आला आणि त्याने स्फोटक फलंदाजी केली. अनिकेतने नऊ चेंडूत एका चौकार आणि तीन षटकारांसह २६ धावा काढल्यानंतर बाद झाला. या सामन्यात नितीश रेड्डी प्रभावित करू शकला नाही आणि चार धावा काढल्यानंतर रोमारियो शेफर्डने त्याला बाद केले. त्यानंतर शेफर्डने अभिनव मनोहरला बाद केले जो १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तथापि, इशान खंबीर राहिला आणि त्याने सातत्याने मोठे फटके खेळत संघाचा धावगती कमी होऊ दिली नाही. इशानच्या फलंदाजीच्या जोरावरच सनरायझर्सना २३० धावांचा टप्पा ओलांडता आला. पॅट कमिन्सने सहा चेंडूत एका षटकारासह १३ धावा काढत नाबाद राहिला. आरसीबीकडून शेफर्डने दोन, तर भुवनेश्वर, एनगिडी, सुयश आणि कृणालने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *