
जॅक कॅलिसला मागे टाकून सर्वात कमी कसोटीत १३ हजार धावा पूर्ण
नॉटिंगहॅम ः इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने तब्बल १४ वर्षांनी सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडीत काढला आहे. तसेच रुट याने जॅक कॅलिस याचाही विक्रम मोडला आहे.
इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार जो रूट सचिन तेंडुलकरच्या विक्रमांचा पाठलाग करण्यास उत्सुक असल्याचे दिसते. जे विक्रम कधीही मोडले जाऊ शकत नाहीत असे म्हटले जात होते, ते जो रूट एक एक करून मोडत आहे. आता जो रूटने सचिन तेंडुलकरला आणखी एका बाबतीत मागे टाकले आहे. एवढेच नाही तर त्याने जॅक कॅलिसचा महान विक्रमही मोडला आहे. जो रूटने फक्त एक छोटी खेळी खेळून ही कामगिरी केली आहे.
कसोटीत १३ हजार धावा पूर्ण
सध्या इंग्लंड क्रिकेट संघ झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. यामध्ये जो रूटने त्याच्या १३ हजार कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. रुट कसोटीत सर्वात जलद १३००० धावा करणारा फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये त्याचा २६६ वा सामना खेळत असताना कसोटीत १३,००० धावा पूर्ण केल्या. सर्वात कमी सामन्यांमध्ये १३ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये जॅक कॅलिस आघाडीवर आहे. २०१३ मध्ये त्याने फक्त १५९ सामने खेळून १३ हजार कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत.
पाच फलंदाज १३ हजारी
सचिन तेंडुलकरनंतर जॅक कॅलिस, रिकी पॉन्टिंग आणि राहुल द्रविड यांनीही कसोटीत आपले १३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी, जॅक कॅलिस आतापर्यंत सर्वात कमी सामने खेळून या स्थानावर पोहोचला होता. परंतु आता जो रूटने ते स्थान पटकावले आहे. आतापर्यंत फक्त पाच फलंदाजांना कसोटीत १३,००० धावा करता आल्या आहेत, त्यापैकी रूट सर्वात जलद धावा करणारा फलंदाज ठरला. जो रूट सध्या त्याचा १५३ वा कसोटी सामना खेळत आहे आणि त्याने १३ हजार धावांचा टप्पा गाठला आहे.
जो रूटने फक्त १५३ सामन्यांमध्ये १३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याची सरासरी सध्या ५० च्या आसपास आहे आणि ३६ शतकांव्यतिरिक्त त्याने ६५ अर्धशतके देखील झळकावली आहेत. आता जो रूट १४ हजार धावांकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंत फक्त सचिन तेंडुलकरलाच हा आकडा गाठता आला आहे. जर जो रूट तिथे पोहोचला तर तो जगातील दुसरा फलंदाज बनेल. आता भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत जो रूट किती धावा काढतो हे पाहण्यासाठी सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील.