ऑली पोपचा धमाकेदार शतकासह विश्वविक्रम 

  • By admin
  • May 24, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

असा पराक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज 

नॉटिंगहॅम ः झिम्बाब्वे संघाविरुद्धच्या एकमेव कसोटीत इंग्लंड संघाच्या आघाडीच्या तीन फलंदाजांनी शानदार शतके साजरी केली. त्यात ऑली पोप याने धमाकेदार शतक ठोकून विश्वविक्रम नोंदवला. कसोटीत असा पराक्रम करणारा पोप हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. 

कसोटी क्रिकेट हा सर्वात लांब फॉरमॅट आहे आणि तो पाच दिवस चालतो. म्हणूनच खेळाडूच्या कौशल्याची खरी परीक्षा येथे होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि गोलंदाजांना चांगलेच झोडपले. इंग्लंडकडून ऑली पोप, जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी शतके साजरी केली. कर्णधार बेन स्टोक्सने ५६५ धावांवर डाव घोषित केला.

कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक 
इंग्लंडचा ऑली पोप तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने सामन्यात अतिशय शिस्तबद्ध फलंदाजी केली आणि संघासाठी १६६ चेंडूत एकूण १७१ धावा केल्या, ज्यात २४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ८ वे शतक आहे. विशेष म्हणजे त्याने आतापर्यंत ८ वेगवेगळ्या संघांविरुद्ध ८ कसोटी शतके झळकावली आहेत.

ऑली पोपने चमत्कार केला
यासह दमदार शतकासह ऑली पोप याने एक विश्वविक्रम रचला आहे आणि ८ वेगवेगळ्या देशांविरुद्ध पहिले ८ कसोटी शतके करणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी ही कामगिरी कोणीही करू शकलेले नाही. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये त्याने भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्ध प्रत्येकी एक शतक झळकावले आहे.

२०१८ मध्ये इंग्लंडकडून पदार्पण केले
ऑली पोप याने २०१८ मध्ये इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून त्याने ५५ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ३१३० धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटने ७ शतके आणि १५ अर्धशतके झळकावली आहेत. तो गेल्या काही काळापासून संघासाठी चांगली कामगिरी करत आहे आणि त्याच्या बॅटमधून खूप धावा येत आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७८३३ धावा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *