
मुंबई ः इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल हा करणार आहे. शुभमन गिल हा भारतीय क्रिकेट संघाचा ३७वा कर्णधार बनला आहे.
भारतीय संघ २० जूनपासून इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱयात भारतीय संघ यजमान इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. या दौऱ्यातील पहिला सामना हेडिंग्ले मैदानावर खेळला जाईल, तर शेवटचा कसोटी सामना ३१ जुलैपासून केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जाईल. ही कसोटी मालिका भारतीय संघासाठी एका नवीन युगाची सुरुवात देखील करेल. त्यामध्ये शुभमन गिल पहिल्यांदाच कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल. रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, त्यानंतर नवीन कर्णधाराचे नाव जाहीर होणे स्वाभाविक झाले. या शर्यतीत शुभमन गिल याचे नाव आधीच आघाडीवर होते, जे शनिवारी (२४ मे) जाहीर करण्यात आले आहे.
शुभमन गिल हा कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करणारा ३७ वा कर्णधार ठरेल. आतापर्यंत एकूण ३६ खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले आहे. त्यामध्ये या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद भूषविणारे पहिले कर्णधार कर्नल सी के नायडू होते. भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने एकूण ६८ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले, त्यापैकी ४० सामने भारतीय संघाने जिंकले तर १७ सामने गमावले. या फॉरमॅटमध्ये भारताचे कर्णधारपद स्वीकारणारा गिल हा पाचवा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे.
भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविलेले खेळाडू
कर्नल सी के नायडू (४ कसोटी), विजयनगरमचे महाराज कुमार (३ कसोटी), इफ्तिकार अली खान पटोदी (३ कसोटी), लाला अमरनाथ (१५ कसोटी), विजय हजारे (१४ कसोटी), विनू मांकड (६ कसोटी), गुलाम अहमद (३ कसोटी), पॉली उम्रीगर (८ कसोटी), हेमू अधिकारी (१ कसोटी), दत्ता गायकवाड (४ कसोटी), पंकज रॉय (१ कसोटी), गुलाबराय रामचंद (५ कसोटी), नरी कॉन्ट्रेक्टर (१२ कसोटी), मन्सूर अली खान पटोदी (४० कसोटी), चंदू बोर्डे (१ कसोटी), अजित वाडेकर (१६ कसोटी), एस व्यंकटराघवन (५ कसोटी), सुनील गावसकर (४७ कसोटी), बिशनसिंग बेदी (२२ कसोटी), गुंडाप्पा विश्वनाथ (२ कसोटी), कपिल देव (३४ कसोटी), दिलीप वेंगसरकर (१० कसोटी), रवी शास्त्री (१ कसोटी), एस श्रीकांत (४ कसोटी), मोहम्मद अझरुद्दीन (४७ कसोटी), सचिन तेंडुलकर (२५ कसोटी), सौरव गांगुली (४९ कसोटी), राहुल द्रविड (२५ कसोटी), वीरेंद्र सेहवाग (४ कसोटी), अनिल कुंबळे (१४ कसोटी), महेंद्रसिंग धोनी (६० कसोटी), विराट कोहली (६८ कसोटी), अजिंक्य रहाणे (६ कसोटी), केएल राहुल (३ कसोटी), रोहित शर्मा (२४ कसोटी), जसप्रीत बुमराह (३ कसोटी).