
मलेशिया मास्टर्स सुपर ५००
क्वालालंपूर ः मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या युशी तनाका याला सरळ गेममध्ये पराभूत करून भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने सहा वर्षांत प्रथमच बीडब्ल्यूएफ स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
२०२३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या श्रीकांतने अचूक नेट प्ले आणि आक्रमक खेळाच्या जोरावर शानदार खेळ दाखवत जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानावर असलेल्या तनाकाचा २१-१८, २४-२२ असा पराभव केला.
२०१९ च्या इंडिया ओपनमध्ये श्रीकांत उपविजेता होता आणि त्यानंतर ३२ वर्षीय खेळाडूचा बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरमधील हा पहिला अंतिम सामना आहे. २०१७ मध्ये त्याने चार जेतेपदे जिंकली आहेत. माजी जागतिक नंबर वन श्रीकांत गेल्या काही हंगामात खराब फॉर्म आणि तंदुरुस्तीच्या काळातून जात आहे ज्यामुळे तो आता जागतिक क्रमवारीत ६५ व्या स्थानावर आहे.
मलेशिया मास्टर्स स्पर्धेतील श्रीकांतचा प्रवास
यापूर्वी, श्रीकांतने फ्रान्सच्या उच्च मानांकित टोमा ज्युनियर पोपोव्हवर तीन गेममध्ये विजय मिळवून अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले होते. ६५ व्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतने क्वार्टर फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत १८ व्या क्रमांकावर असलेल्या पोपोव्हला कडक लढत दिली आणि एक तास १४ मिनिटांत त्याला २४-२२, १७-२१, २२-२० असे पराभूत केले. यापूर्वी, श्रीकांतने जागतिक क्रमवारीत ३३ व्या स्थानावर असलेल्या गुयेनविरुद्ध ५९ मिनिटांच्या प्री-क्वार्टर फायनल सामन्यात २३-२१, २१-१७ असा विजय मिळवला होता. दरम्यान, श्रीकांतने चिनी तैपेईच्या हुआंग यू काईचा ९-२१, २१-१२, २१-६ असा पराभव करून मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवले होते.