
बास्केटबॉल चॅम्पियनशिप
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत थरारक लढतीत इंडियन कॅडेट्स, ठक्कर फर्निचर, मॅक्सेल व एम डी बुल्स संघांनी विजयी आगेकूच केली आहे.
चॅम्पियन्स क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित छत्रपती संभाजीनगर बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत दमदार सामन्यांची मालिका पाहायला मिळत आहे. मुलींच्या गटातील पहिल्या सामन्यात इंडियन कॅडेट्स संघाने एस एफ एस संघावर ५३-४६ गुणांनी विजय मिळवला. या सामन्यात कृष्णा गायकवाड हिने अचूक थ्री पॉइंट शॉट्ससह १८ गुणांची शानदार खेळी करत ‘उत्कृष्ट खेळाडू’चा पुरस्कार पटकावला. तिला प्रतीक्षा बरेटीये, सानिका यांच्या फास्ट ब्रेक्स व त्रिभुवन हिच्या साथीने भक्कम साथ मिळाली.
दुसऱ्या सामन्यात ठक्कर फर्निचर संघाने मॅक्सेल संघावर ५६-४३ गुणांनी विजय मिळवला. या सामन्यात उन्नती डोंगरे हिचा प्रभावी खेळ पाहायला मिळाला. केतकी ढंगारे हिच्या उत्कृष्ट डिफेन्समुळे संघाला मोलाची मदत मिळाली. पलक मोरे हिने उल्लेखनीय योगदान दिले.
मुलांच्या गटातील अंकुर इंडस्ट्री आणि मॅक्सेल संघात झालेला सामना अतिशय अटीतटीचा ठरला. मॅक्सेल संघाने अवघ्या एका गुणांनी ७१-७० असा रोमांचक विजय मिळवला. विजयी संघाकडून अक्षय खरात व अर्णव देशमुख यांनी लाजवाब खेळ केला, तर अक्षय खरात याला सामन्याचा ‘उत्कृष्ट खेळाडू’ पुरस्कार मिळाला. पराभूत संघ अंकुर इंडस्ट्रीकडून नरेंद्र चौधरी, ऋषिकेश दरक व साहिल धनवटे यांनी निकराचा लढा दिला.
एम डी बुल्स संघाने एस एफ एस संघावर ६९-६० गुणांनी मात केली. या सामन्यात शुभम व जयश पाटील यांच्या जलद खेळाने निर्णायक क्षणी संघाला विजय मिळवून दिला.जयश पाटील याला ‘उत्कृष्ट खेळाडू’चा पुरस्कार मिळाला. एस एफ एस संघाकडून रोहित परदेशी व रजत बकाल यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.