
नाशिक ः नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात क्रिकेट सुविधांचा विकास करून महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी एमसीए सदैव कटिबद्ध असल्याचे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित दादा पवार यांनी येथे सांगितले.
नाशिक येथे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱयांनी भेट दिली. या भेटीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना एमसीए अध्यक्ष रोहित दादा पवार यांनी महाराष्ट्रातील क्रिकेट विकासासाठी एमसीए करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

नाशिक येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स या संघाचाही समावेश असणार आहे. या फ्रेंचायसी टी २० स्पर्धांमागची भूमिका, नवोदित खेळाडूंना मिळणारी संधी, संघ मालकांची भूमिका, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन करत असलेले काम, राज्यामध्ये क्रिकेटच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी होत असलेले प्रयत्न या विषयांवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ईगल नाशिक टायटन्स या संघाच्या सरावासाठी होम ग्राउंड म्हणून विनोद यादव यांच्या क्रीडॅक सेंटर फॉर क्रिकेट एक्सलन्स या मैदानाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित दादा पवार यांनी यावेळी पत्रकारांना संबोधित केले.
यावेळी रोहित पवार म्हणाले की, “महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार असून या स्पर्धेमुळे भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेटपटू मिळणार आहेत. सलग तिसऱ्या वर्षी खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या यशात सर्व संघांच्या मालकांचा मोलाचा वाटा आहे. एमपीएल व डब्ल्यूएमपीएल हे केवळ स्पर्धात्मक मंच नसून, एक परिवार आहे. सर्व संघ मालक, खेळाडू, पदाधिकारी, टेक्निकल टीम आणि सपोर्ट स्टाफ यांचे परिश्रम या यशामागे आहेत. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन चेअरमन धनपाल शहा व सचिव समीर रकटे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची सर्व कमिटी नाशिक क्रिकेटच्या विकासासाठी उत्तम प्रयत्न करत आहेत, या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या साथीने नाशिक जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत आहोत व भविष्यात आपल्याला सकारात्मक बदल झालेले दिसतील, हा आम्हाला विश्वास आहे. आज नाशिक मधील अनेक महिला व पुरुष खेळाडू विविध वयोगटांसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आमचा दृढ विश्वास आहे की येत्या काळात एमपीएल व डब्ल्यूएमपीएलच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू महाराष्ट्राकडून व पुढे जाऊन देशासाठी खेळतील. नाशिकच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी सर्व नाशिककर क्रिकेट रसिकांनी स्टेडियमवर यावे व संघाला व एमपीएलच्या सर्व सोशल मीडियाला फॉलो करावे असे आवाहन रोहित पवार यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत आहे. या स्पर्धेमुळे त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक दरवाजे उघडले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी ७५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी, अनेक नवीन प्रतिभान खेळाडू निर्माण करण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात क्रिकेट सुविधांचा विकास करून महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी एमसीए सदैव कटिबद्ध असल्याचे संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
या प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव ॲड कमलेश पिसाळ, एमपीएल चेअरमन सचिन मुळे, अपेक्स कौन्सिल सदस्य सुशील शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष धनपाल शहा, सचिव समीर रकटे, ईगल नाशिक टायटन्स संघमालक हितेश सोलंकी, तसेच मेंटर समद फल्ला, कोच हर्षद खडीवाले, आयकॉन खेळाडू साहिल पारख तसेच जिल्हा संघटनेचे इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.