
पंजाब किंग्ज संघ सहा विकेटने पराभूत, करुण नायर, राहुलची सुरेख फलंदाजी
जयपूर : समीर रिझवी (नाबाद ५८), करुण नायर (४४) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने पंजाब किंग्ज संघाचा सहा विकेट राखून पराभव केला. आयपीएल प्ले-ऑफ फेरी गाठल्यानंतरही पंजाबला हा पराभव चांगलाच अडचणीचा ठरणार आहे. या विजयासह दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल स्पर्धेचा निरोप घेतला. १४ सामन्यात दिल्लीने हा सातवा विजय साकारला तर सहा लढती त्यांनी गमावल्या.
दिल्ली कॅपिटल्स संघासमोर विजयासाठी २०७ धावांचे आव्हान होते. केएल राहुल व कर्णधार फाफ डू प्लेसिस ही सलामी जोडी धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली. या जोडीे ५५ धावांची आक्रमक भागीदारी करत संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. सहाव्या षटकात जॅनसेन याने राहुल याची विकेट घेऊन दिल्लीला पहिला धक्का दिला. राहुलने २१ चेंडूत ३५ धावांचे योगदान दिले. त्याने सहा चौकार व एक षटकार मारला. त्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस २३ धावांवर बाद झाला. त्याने दोन चौकार व एक षटकार मारला.

सलामी जोडी बाद झाल्यानंतर करुण नायर व सैदिकुल्लाह अटल या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी २८ धावा जोडल्या. प्रवीण दुबे याने अटलची विकेट २२ धावांवर घेऊन दिल्लीला तिसरा धक्का दिला. त्याने दोन टोलेजंग षटकार मारले. ११व्या षटकात ९३ धावांवर दिल्लीची तिसरी विकेट पडली. त्यानंतर करुण नायर याने दुबे याला सलग चार चौकार ठोकत दबाव हटवला. नायर-रझवी जोडीने चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करत सामन्यातील रंगत वाढवली. हरप्रीत ब्रार याने करुण नायर याला ४४ धावांवर क्लीन बोल्ड करुन संघाला मोठे यश मिळवून दिले. नायरने २७ चेंडूत पाच चौकार व दोन षटकार ठोकत ४४ धावा फटकावल्या. त्यानंतर समीर रिझवीने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत वादळी फलंदाजी केली. समीरने २५ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी करुन पंजाबचा पराभव निश्चित केला. समीरने तीन चौकार व पाच टोलेजंग षटकार मारले. त्यानेच विजयी षटकार ठोकला. ट्रिस्टन स्टब्सने नाबाद १८ धावा फटकावल्या. त्याने दोन चौकार मारले. दिल्लीने १९.३ षटकात चार बाद २०८ धावा फटकावत शानदार विजय साकारला. पंजाब संघाकडून ब्रार याने ४१ धावांत दोन गडी बाद केले. जॅनसेन याने ४१ धावांत एक तर दुबे याने २० धावांत एक गडी बाद केला.
पंजाबची दमदार फलंदाजी
दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्ज संघास प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पंजाब संघाने २० षटकात आठ बाद २०६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मात्र, पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात खराब झाली. आक्रमक फलंदाज प्रियांश आर्य अवघ्या ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर प्रभसिमरन आणि जोश इंगलिस या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची जलद भागीदारी केली. जोश इंगलिस अवघ्या १२ चेंडूत ३२ धावांची धमाकेदार खेळी करुन बाद झाला. विप्रज निगम याने त्याचा बळी घेतला. त्याने तीन चौकार व दोन षटकार मारले.

प्रभसिमरन व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी धावगती कायम ठेवली. प्रभसिमरन १८ चेंडूत २८ धावा फटकावून बाद झाला. विप्रज निगम याने त्याला क्लीन बोल्ड केले. त्याने चार चौकार व एक षटकार मारला. त्यानंतर नेहल वढेरा एक आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात १६ धावांवर तंबूत परतला. शशांक सिंग ११ धावांवर बाद झाला.
एका बाजूने ठराविक अंतराने विकट पडत असताना कर्णधार श्रेयस अय्यर याने शानदार फलंदाजी करत अर्धशतक साजरे केले. अय्यरने ३४ चेंडूत ५३ धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार व दोन उत्तुंग षटकार मारले. अझमतुल्लाह (१), मार्को जॅनसेन (०) हे तळाचे फलंदाज स्वस्तात बाद होत असताना स्टोइनिस याने वादळी फलंदाजी केली. त्याने अवघ्या १६ चेंडूत नाबाद ४४ धावा फटकावत सामन्याचे चित्र बदलून टाकले. त्याने चार टोलेजंग षटकार व तीन चौकार मारले. स्टोइनिसच्या नाबाद ४४ धावांच्या खेळीमुळे पंजाब संघ २०० धावांचा टप्पा गाठू शकला. पंजाबने २० षटकात आठ बाद २०६ धावसंख्या उभारली.
दिल्ली संघाकडून मुस्तफिजूर याने ३३ धावांत तीन विकेट घेतल्या. विप्रज निगम याने ३८ धावांत दोन बळी घेतले. कुलदीप यादव थोडा महागडा ठरला. कुलदीपने ३९ धावांत दोन गडी बाद केले.