
– गणेश कड,
सह-सचिव, महा बास्केटबॉल संघटना आणि
अध्यक्ष, जिल्हा बास्केटबॉल संघटना व एम एस एम बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन, छत्रपती संभाजीनगर.

निश्चितपणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बास्केटबॉल खेळाची क्रेझ मागील साडेतीन दशकापासून टिकून आहे. जिल्ह्यात बास्केटबॉल खेळाला खऱयाअर्थाने १९८८ पासून चालना मिळाली. व्यक्तीशः ज्यावेळी मी सराव शिबिरांचे आयोजन सुरू केले त्यावेळी खेळाडू प्रत्येक कानाकोपऱ्यातून व वेळेच्या आत मैदानावर हजर राहण्यासाठी आपापल्या घरून निघत असे. त्यावेळी रस्त्यावर चोहोबाजूंनी खेळाडू मार्गक्रमण करून वेळेच्या आत मैदानावर हजर राहात असे, ते चित्र अतिशय मनमोहक व अत्यंत बोलके व भविष्याला चांगली वाट निर्माण करून देणारे ठरणार होते, अशी मनोमन भावना होती व कालांतराने त्यात कुठल्याही प्रकारचा बदल न होता दिवसागणिक बास्केटबॉल खेळ संपूर्ण जिल्ह्यात विस्तारला गेला व अनेक नवतरुण बास्केटबॉल खेळाडू नावारूपाला आले व त्यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला.
बास्केटबॉल खेळाची क्रेझ वाढीला लागण्यासाठी मागील काही काळापूर्वीचा कोरोनाचा कार्यकाळ देखील पुरकच ठरला. ज्यात, राज्य पातळीवर महा बास्केटबॉल संघटना तर जिल्ह्यात जिल्हा बास्केटबॉल संघटना व मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे बास्केटबॉल मैदान, या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाच्या विविध उपक्रमांची सांगड घालून घरबसल्या बास्केटबॉल खेळाचा सराव, वैयक्तिक पातळीवर क्रीडा कौशल्य विकसित करणे, आपले आरोग्य सुदृढ व निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी शारीरिक कसरतींची आवश्यकता व महत्व, ऑनलाईन क्विज, पंच व प्रशिक्षण शिबीर व परीक्षा, नामवंत बास्केटबॉल तज्ञ व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक प्राप्त व्यक्ती यांच्या समवेत चर्चा सत्रे, अशा अनेक बाबींमुळे राज्याच्या व जिल्ह्यातील प्रत्येक घराघरात बास्केटबॉल खेळ पोहोचला आणि कालांतराने त्याचे रूपांतर मैदानावर दिसू लागले.
तसे पाहता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास दीडशेपेक्षा अधिक तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण बास्केटबॉल खेळांची मैदाने उपलब्ध आहेत. त्यात विविध शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, महानगरपालिका मैदान, विद्यापीठ, साई क्रीडा प्रशिक्षण केंद्र अशा अनेक ठिकाणी मैदाने विस्तारली गेली आहेत. तसेच मागील काही कालखंडात विविध हाऊसिंग सोसायटी, वैयक्तिक घरी उपलब्ध असलेल्या जागेत बास्केटबॉल खेळाची मैदाने तयार होत असल्याने, एकप्रकारे जिल्ह्यात बास्केटबॉल खेळ घराघरात पोहोचत आहे आणि हे चित्र निश्चितच सुखावह आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घेण्यात येत असलेल्या विविध स्तरावरील बास्केटबॉल स्पर्धेच्या आयोजनात आता पालक देखील आमच्यासाठी स्पर्धेचे आयोजन करावे अशी मागणी करीत आहेत व त्यामुळे जिल्ह्यात बास्केटबॉल खेळाला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त होताना दिसून येत आहे.
मागील काही काळात काही मुलांची शारीरिक व मानसिक वाढ न होणे, लठ्ठपणा येणे, उंची न वाढणे, अस्थमासारख्या आजारावर उपाययोजना अशा अनेक बाबींकरता डॉक्टर सुद्धा पालकांना आपल्या पाल्यांना बास्केटबॉल खेळ खेळण्याचा सल्ला देत असून त्याचा त्यांना भरपूर फायदा देखील होत असल्याने दिसून आल्याने बास्केटबॉल खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे, मुलांची आकलन क्षमता देखील वाढत आहे.
तसेच दैनंदिन सरावा दरम्यान बहुतांश खेळाडू वेफर्स, चिवडा इत्यादी न खाता फळे व ड्रायफूट खाण्याकडे कल वाढत असल्याने पालक देखील खुश होत आहेत व खेळाडू अधिक सुदृढ होण्यात कमालीची मदत मिळत आहे.
बास्केटबॉल खेळ हा अतिशय वेगवान पद्धतीने खेळला जातो व त्यासाठी खेळाडूंची शारीरिक क्षमता, खेळाचे क्रीडा कौशल्य व अल्प वेळेत निर्णय घेऊन संघ विजयी करण्यासाठी बुद्धिचातुर्य देखील तेवढेच महत्वाचे ठरते व शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते. ज्या खेळाडूंची शारीरिक व मानसिक वाढ होण्यास बाधा येत असेल तर ती बाधा दूर करण्यास मदत होते. तसेच काही खेळाडू वा व्यक्तीला लठ्ठपणा आला असेल तर तो नाहीसा व कमी करण्यास व शरीर सुदृढ ठेवण्यास मोलाची मदत होते व निश्चितपणे आकलन क्षमता देखील वाढते व त्यामुळे त्याला कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना इतर विद्यार्थ्यांसारखे सतत वाचन व अध्ययन करण्याची आवश्यकता राहात नाही, त्याने एक किंवा दोन वेळेस जरी वाचन केले तरी त्या विषयात तो निपुण ठरतो.
बास्केटबॉल खेळाला संपूर्ण जगाने बहुव्यापी बनवले आहे, जगभरात जवळपास १५० पेक्षा अधिक देशात बास्केटबॉल खेळ खेळला जात आहे व त्याची व्याप्ती दिवसागणिक वाढतच आहे. बास्केटबॉल खेळ हा एक परिपूर्ण खेळ असून तो इतर खेळासाठी देखील पूरक असा खेळ आहे. बास्केटबॉल खेळ हा बाल वयोगटापासून ते वयोवृद्ध (वयोगट मुले व मुली – १०, १३, १६, १८, २१, २३, २५, खुला वयोगट व वयस्कर वयोगट (३५ पेक्षा पुढील वयोगट, अपंगत्व वयोगट) होईपर्यंत खेळता येत असल्याने सर्वसामान्य व्यक्तींच्या मनातील ताईत ठरत चालला आहे,
देशात बास्केटबॉल खेळ शालेय स्तरावर इयत्ता चौथीपासून ते आठवीपर्यंत १० व १३ वयोगट, इयत्ता नववी ते दहावी पर्यंत १६ वयोगट, अकरावी ते बारावी १८ वयोगट, पदवी ते पीएचडी उच्च शिक्षण व वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत विद्यापीठ स्तरावर, तर खुल्या वयोगटातून खेळण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वयाची अट नसल्याने भरपूर प्रमाणात खेळण्यास वाव उपलब्ध आहे.
या माध्यमातून आजतागायत जिल्ह्यातील बास्केटबॉल खेळाडूंनी अनुक्रमे यशस्वी व्यावसायिक, राजकीय नेता, विंग कमांडर, पोलिस खात्यात विविध पदांवर, शासकीय सेवेत, विविध बँका, खासगी कंपन्या, शैक्षणिक संस्थेत प्राध्यापक, संचालक, प्रशिक्षक पंच, व संघटक म्हणून अनेकांनी आपापला कसब पणाला लावून आपले उदरनिर्वाहाचे साधन यशस्वीपणे प्राप्त करीत आहेत.
मुख्यत्वे अमेरिका व बहुसंख्य युरोप खंडात बास्केटबॉल खेळाला अनन्यसाधारण महत्व असून त्यांच्या रोजच्या जीवनशैलीत बास्केटबॉल खेळ गळ्यातील ताईत झाला आहे व त्याच धर्तीवर आपल्याकडे देखील एकप्रकारे जनतेच्या मनातील व हृदयात घर करणारा असा एकमेव बास्केटबॉल खेळ ठरत आहे. भारतात देखील मागील दोन दशकांपासून बास्केटबॉल खेळ मोठ्या झपाट्याने अतिशय लोकप्रिय ठरत असून आशिया खंडात मानांकनात पहिल्या दहा देशांपर्यंत मजल मारली आहे.
भारतीय पातळीवर महाराष्ट्र राज्याचे देखील अव्वलस्थान आहे. राज्याच्या मुख्यत्वे मुलींच्या सब-ज्युनिअर, युवा, महिला गटांचा देश पातळीवर दबदबा असून, मुलांचे संघ देखील अतिशय अग्रेसर व प्रगतीपथावर आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची देखील बास्केटबॉल खेळाने देश व विदेश पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून जिल्हा बास्केटबॉल संघटना व मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे बास्केटबॉल मैदान यांच्या माध्यमातून व महा बास्केटबॉल संघटनेच्या सहकार्याने सातत्याने राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन, राष्ट्रीय पातळीवर राज्याच्या संघांच्या सहभागासाठी सराव शिबिरांचे आयोजनामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा बास्केटबॉल खेळासाठी एक हब म्हणून नावारूपाला आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यात इतर जिल्हे व राज्यातील विविध वयोगटातील मुले व मुली आपापले क्रीडा कौशल्य पणाला लावत आहेत व आपापली बास्केटबॉल खेळासाठीची ओळख निर्माण करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बास्केटबॉल खेळाची क्रेज अतिशय झपाट्याने वाढीस लागली असल्याचे चित्र दिसत आहे व ही बाब जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात पूरक ठरणार आहे.