
छत्रपती संभाजीनगर ः चॅम्पियन्स क्रीडा मंडळ बेगमपुरा, युनिटी बास्केटबॉल अकॅडमी आणि डीसीबीए बास्केटबॉल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत रोमांचक सामने, जबरदस्त संघभावना आणि तडाखेबाज कामगिरी पाहायला मिळाली.
या स्पर्धेत मुलींच्या सामन्यात एस एफ एस संघाने मॅक्सेल संघावर ५४-३१ बास्केट फरकाने विजय मिळविला. या सामन्यात कनिष्का गायकवाड, निशा इरमुळे, तनिष्का सोनवणे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. या सामन्यात कनिष्का गायकवाडला उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात आला. कनिष्काच्या आक्रमक खेळाने आणि अचूक स्कोअरिंगमुळे एसएफएस संघाला दणदणीत विजय मिळवता आला.
मुलांच्या गटात अंकुर आणि इंडियन कॅडेट्स यांच्यातील चुरशीच्या सामन्यात इंडियन कॅडेट्स संघाने ९०-८२ असा विजय संपादन ेकला. अनुज याने सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार संपादन केला. अनुजच्या नेतृत्वगुणांमुळे आणि उत्कृष्ट खेळामुळे इंडियन कॅडेट्सने जोरदार विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात ठक्कर संघाने एसएफएस संघावर ७६-६४ असा चुरशीचा विजय मिळवाल. या लढतीत सुदर्शन जाधव हा सर्वोत्तम खेळाडू ठरला. सुदर्शन जाधव, अभिषेक अंभोरे, सिद्धांत राज यांच्या अभेद रिबाउंड तसेच सुदर्शन जाधवच्या अष्टपैलू खेळाने ठक्कर संघाने महत्त्वाचा विजय नोंदवला.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी स्पर्धेचे आयोजक ॲड संजय डोंगरे, संदीप ढंगारे, महेश इंगळे, प्रदीप लाटे, अभिजित शिंदे, सागर धटिंग, अभय हजारी, अजय सोनवणे, अल्केश डोंगरे, स्वप्नील पेरकर, समाधान बेलेवार, श्रद्धा भिकणे, रागिणी कुसाळे, नीतू संभेराव, मीनल पठाडे आदींनी पुढाकार घेतला आहे.