
शरदराव गोडसे यांना क्रीडा भारती जीवनगौरव पुरस्कार; खेळाडूंच्या मातांचा होणार गौरव
पुणे ः क्रीडा भारती संस्थेतर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा जिजामाता पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यंदाच्या मानकऱ्यांमध्ये एव्हरेस्टवीर भूषण हर्षे, कबड्डीपटू आम्रपाली गलांडे, कुस्तीगीर अमोल बराटे इत्यादी नामवंत खेळाडूंच्या मातांचा समावेश आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात (रेणुका स्वरूप प्रशालेचे आवार) गुरूवारी (२९ मे) सायंकाळी ६.३० वाजता राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे आणि तेनसिंग नोर्गे पुरस्कार विजेते गिर्यारोहक व संघटक उमेश झिरपे यांच्या हस्ते हा समारंभ होणार आहे. यावेळी क्रीडा भारती संस्थेचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय पुरंदरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या जिजामाता पुरस्कार विजेत्यांमध्ये कुस्तीगीर अमोल बराटे याची आई चंदा, वुशूपटू कल्याणी जोशी हिची आई अनुराधा, बुद्धिबळपटू आदित्य सामंत याची आई संध्या, स्केटिंगपटू श्रुतिका सरोदे हिची आई रंजना, मॉडर्न पेन्टथलॉन खेळाडू विराज परदेशी याची आई बेला, ॲथलेटिक्स खेळाडू यमुना लडकत हिची आई सुनंदा, एव्हरेस्टवीर भूषण हर्षे याची आई भाग्यश्री, योगासनपटू नितीन पवळे याची आई जयश्री, प्रस्तारोहण खेळाडू सानिया शेख हिची आई निगर, तायक्वांदो खेळाडू कोमल संकेत घारे हिची आई सुरेखा यांचा समावेश आहे.
याच कार्यक्रमामध्ये युवा खेळाडू सान्वी गोसावी (टेनिस), सिद्धी जाधव (टेनिक्वाईट), आरूष जोशी (क्रिकेट), कार्तिकी राक्षे (बॉल बॅडमिंटन),आदित्य गाडे (ॲथलेटिक्स) गार्गी भट (योगासन) यांचा सत्कार केला जाणार आहे. क्रीडा भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व संघटक शरदराव गोडसे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. प्रत्येक खेळाडूच्या यशामागे त्याच्या आई-वडिलांनी केलेल्या त्यागाचा मोठा वाटा असतो हे लक्षात घेऊनच दरवर्षी क्रीडा भारती संस्थेतर्फे खेळाडूंच्या मातांचा जिजामाता पुरस्काराने गौरव केला जातो, असे अध्यक्ष शैलेश आपटे व मंत्री विजय रजपूत यांनी सांगितले.