
सोलापूर ः शिर्डी-कोपरगाव आत्मा मलिक क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेमध्ये अक्कलकोट मधील एस बी क्रिकेट अकॅडमी संघाने चमकदार कामगिरी नोंदवत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत एस बी क्रिकेट अकादमीने संघाने पहिल्या सामन्यामध्ये के बी क्रिकेट क्लब सातारा संघावर ११० धावांनी विजय मिळवला. तसेच दुसऱ्या सामन्यात शिरसाट स्पोर्ट्स अकॅडमी पाथर्डी या संघावर १२५ धावांनी विजय मिळवला व तिसऱ्या सामन्यात पोवाई क्रिकेट अकॅडमी मुंबई संघावर ६ गडी राखून विजय मिळवत एस बी क्रिकेट अकादमीने आगेकूच कायम ठेवली.
चौथ्या सामन्यामध्ये पोवाई क्रिकेट अकॅडमी मुंबई संघावर १२ धावांनी विजय मिळवला. तसेच स्पर्धेच्या चुरशीच्या अंतिम सामन्यांमध्ये रायझिंग स्टार धाराशिव संघावर ७ धावांनी विजय मिळवून विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून अभिषेक शिंदे याने ५ सामन्यामध्ये २६० धावा केल्या व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सैफ मुत्तवली याने ५ सामन्यामध्ये १० बळी घेतले. तसेच प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून अभिषेक शिंदे व इमर्जिंग प्लेयर म्हणून केदार चव्हाण, साहिल शेख हे अव्वल ठरले.
विजेत्या संघात कर्णधार अभिषेक शिंदे, उपकर्णधार साहिल शेख, सैफ मुत्तवली, अबरार शेख, केदार चव्हाण, निलेश जोशी, माही राठोड, अथर्व भास्कर, महादेव कोळी, प्रसन्न कोटणीस, जय बनसोडे, श्रीपाद उंबरजे, रितेश माने, गणेश भंडारे या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाला प्रशिक्षक सागर बनसोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
या कामगिरीबद्दल आत्मा मलिक क्रिकेट ग्राउंडचे मार्गदर्शक संदीप शिंदे, विभाग प्रमुख संदीप बोळीज, पंच प्रशांत शर्मा, राहुल रोकडे, प्रवीण इंगोले, अक्षय नागरे यांनी विजयी खेळाडूंना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. विजयी संघाला संघाचे आधारस्तंभ व अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, अविनाश मडिखांबे यांनी अभिनंदन केले.