
मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने ७ ते १४ वर्षांमधील ८ वयोगटातील शालेय मुला-मुलींची क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते अमृत महोत्सवी चषक जलद बुद्धिबळ स्पर्धा ३१ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.
प्रत्येक वयोगटातील गुणानुक्रमे पहिल्या १५ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कारासह गौरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात स्विस लीग पध्दतीच्या किमान ४ फेऱ्यांमध्ये रंगणार आहे. प्रत्येक साखळी फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील.
संयोजकांतर्फे स्पर्धकांना बुद्धिबळ पट व घड्याळ दिली जाणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी सहसचिव ओमकार चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (९३२४७ १९२९९) यांच्याकडे व्हॉटसअॅपवर २७ मेपर्यंत संपर्क साधावा.