
१४ सामन्यांत चेन्नईचा चौथा विजय तर गुजरातचा पाचवा पराभव
अहमदाबाद ः आयपीएल स्पर्धेच्या गुणतालिकेत १८ गुणांसह आघाडीवर असलेल्या गुजरात टायटन्स संघाला शेवटच्या १४व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. चेन्नईने हा सामना ८३ धावांनी जिंकून स्पर्धेचा समारोप गोड केला. तळाशी असलेल्या चेन्नईचा हा केवळ चौथा विजय आहे.
गुजरात टायटन्स संघाला शेवटच्या सलग दोन सामन्यांत लखनौ सुपर जायंट्स (दोन बाद २३५ धावा) आणि पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्ज (पाच बाद २३०) अशा मोठा धावसंख्येचा पाठलाग करावा लागला. दोन्ही सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाला पराभवाचा सामना करावा लागला हे विशेष. शुभमन गिलला सलग दोन लढतीत पराभव स्वीकारावा लागला.
चेन्नई संघाच्या २३५ धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरात संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार शुभमन गिल अवघ्या १३ धावांवर बाद झाला. त्याने एक चौकार व एक षटकार मारला. अंशुल कंबोज याने गिलची विकेट घेऊन गुजरातच्या डावाला खिंडार पाडले. जोस बटलर (५), रदरफोर्ड (०), शाहरूख खान (१९) हे आघाडीचे धमाकेदार फलंदाज स्वस्तात बाद झाले. एका बाजूने आक्रमक फलंदाजी करत असलेला साई सुदर्शन ४१ धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजा याने त्याला बाद केले. त्याने सहा चौकार मारले. १० षटकात गुजरात संघाने ८६ धावसंख्येवर पाच फलंदाज गमावले होते.
त्यानंतर गुजरातचा डाव गडगडला. राहुल तेवतिया (१४), रशीद खान (१२), जेराल्ड कोएत्झी (५), अर्शद खान (२०), साई किशोर (३) हे स्वस्तात बाद झाले. सिराज ३ धावांवर नाबाद राहिला. गुजरात संघ १८.३ षटकात १४७ धावांवर सर्वबाद झाला.
चेन्नई संघाकडून अंशुल कंबोज (३-१३) व नूर अहमद (३-२१) यांनी प्रभावी मारा करत प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा (२-१७), खलील अहमद (१-१७), पाथिराणा (१-२९) यांनी विजयाला हातभार लावला.
चेन्नई संघाची धमाकेदार फलंदाजी
डेव्हॉन कॉनवे आणि त्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिस यांच्या शानदार स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने गुजरातसमोर विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले. ब्रेव्हिसने फक्त १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे सीएसके संघाला २० षटकांत पाच बाद २३० धावांपर्यंत पोहोचता आले. सीएसकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याकडून कॉनवे आणि ब्रेव्हिसने अर्धशतके झळकावली. शेवटी ब्रेव्हिसने स्फोटक फलंदाजी केली ज्यामुळे सीएसके २०० धावांचा टप्पा ओलांडू शकले.

प्रथम फलंदाजी करताना आयुष म्हात्रे आणि कॉनवे यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. म्हात्रे सुरेख फॉर्ममध्ये दिसत होता पण प्रसिद्ध कृष्णाने त्याला बाद केले. १७ चेंडूत ३४ धावा करून म्हात्रे बाद झाला. यानंतर, कॉनवे याने उर्विल पटेलसोबत अर्धशतकी भागीदारी केली जी साई किशोरने उर्विलला बाद करून मोडली. १९ चेंडूत ३७ धावा काढून उर्विल पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर शाहरुख खानने १७ धावा करून बाद झालेल्या शिवम दुबेला बाद केले.
कॉनवेने ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले पण पुढच्याच चेंडूवर रशीद खानने त्याला बाद केले. कॉनवेने ३५ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह ५२ धावा काढल्या आणि तो बाद झाला. यानंतर, ब्रेव्हिस आणि रवींद्र जडेजा यांनी जबाबदारी स्वीकारली आणि पाचव्या विकेटसाठी ३९ चेंडूत ७४ धावांची भागीदारी केली. ब्रेव्हिसने खूप धावा केल्या आणि स्फोटक फलंदाजी केली. या हंगामात ब्रेव्हिसने सीएसकेसाठी १७ षटकार मारले आहेत. तथापि, डावाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. ब्रेव्हिसने २३ चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांसह ५७ धावा केल्या आणि तो बाद झाला.
सीएसकेकडून, जडेजा १८ चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २१ धावा काढून नाबाद परतला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन, तर आर साई किशोर, रशीद खान आणि शाहरुख खानने प्रत्येकी एक विकेट घेतली.