
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी सोलापूरची पहिली यशस्वी करारेपटू
सोलापूर ः ताश्कंद , उझबेकीस्तान येथे २३ ते २५ मे या कालावधीत झालेल्या वर्ल्ड कराटे फेडरेशनची मान्यता असलेल्या एशियन कराटे फेडरेशन आयोजित २१व्या सीनिअर व पॅरा एशियन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या भुवनेश्वरी सुरेश जाधव हिने वैयक्तिक कुमिते प्रकारात कास्य पदक जिंकून देशाच्या अधिकृत कराटे इतिहासात प्रथमच पदक पटकावले. या स्पर्धेत उपांत्य फेरी पर्यंत धडक मारणारी ती पहिली भारतीय कराटेपटू ठरली आहे.
आशिया खंडातील सोळा बलाढ्य देशांच्या कराटे खेळाडूंपैकी पूल क्रमांक दोन मधून पहिल्या फेरीत ३२वी वर्ल्ड रँक असलेल्या व गत एशियन गेम्स मधील कांस्य पदक जिंकलेल्या जॉर्डनच्या खेळाडूला ६-४ गुणांनी हरवून भुवनेश्वरीने दुसऱ्या फेरीत चीनच्या वर्ल्ड रँक दहा प्लेअर, गत एशियन गेम्स रौप्य पदक विजेतीला १०-७ च्या फरकाने मात दिली.
उपांत्य फेरीत जपानची वर्ल्ड रँकर तीन व गत एशियन सुवर्णपदक विजेत्या अनुभवी खेळाडूकडून भुवनेश्वरीला २-७ गुणांनी तिला हार मानावी लागली. पण थायलंड सोबत कांस्य पदकासाठी लढताना ५-२ अशा गुणांसह भुवनेश्वरीने भारताकडे पदक खेचून आणण्यात ऐतिहासिक यश मिळवले.
वर्षापूर्वी साऊथ एशियन स्पर्धेत झालेल्या गंभीर दुखापतीनंतर केलेल्या शस्त्रक्रियेनंतर भारतीय कोच कीर्तन कोंड्रू यांनी एशियन कोच अरिवलन यांच्यासह पूर्ण रणनीती आखून वर्षभर मलेशिया व उझबेकिस्तान येथे विविध कौशल्यांचा सराव, आहार, व्यायाम योग यांची रचना करत अनेक वर्षांची भारताची पदकाची अपेक्षा भुवनेश्वरीकडून पूर्ण करवून घेतली. या यशामागे कठोर साधना व प्रशिक्षकांच्या रणनीतीसह सद्गुरु स्वामी गोविंददेव गिरी यांचे विशेष आशीर्वाद, आर आर वायर्सचे महेंद्र काबरा व गीता परिवाराचे डॉ संजय मालपाणी यांचा सदैव सहयोग आणि आई संगीता व स्व वडील सुरेश जाधव यांचा खंबीर पाठिंबा असल्याचे भुवनेश्वरीने सांगितले.
कराटे ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भरत शर्मा, सचिव संजीव जांगरा , महाराष्ट्र सचिव संदीप गाडे यांनी भुवनेश्वरीसह अन्य पदकविजेते आलिषा व पॅरा ॲथलिट तरुण वर्मा यांचे विशेष कौतुक करत प्रत्येकी दीड लाखांचे बक्षीस घोषित केले आहे. भुवनेश्वरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मास्टर ऑफ योग अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी असून या यशाबद्दल कुलगुरू डॉ प्रकाश महानवर, डॉ लक्ष्मीकांत दामा, डॉ अतुल लकडे,
विभाग प्रमुख डॉ धनवट, डॉ जगताप आणि सिनेट सदस्य सचिन गायकवाड यांनी तसेच सोलापूरचे तीनही आमदार व राष्ट्रवादीचे संतोष पवार आणि जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार व शिवस्मारकचे संचालक गंगाधर गवसणे व रंगनाथ बंकापुरे यांनी भुवनेश्वरीचे कौतुक केले आहे.
सोलापूर विद्यापीठ भुवनेश्वरीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार
एशियन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची विद्यार्थिनी भुवनेश्वर जाधवने कांस्यपदक पटकाविले असून ही बाब अभिमानास्पद आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला विद्यापीठाने दोन लाखांची मदत केली असून विद्यापीठाच्या वतीने तिचा भव्य सत्कार करण्यात येईल. या पुढील स्पर्धेसाठी विद्यापीठ खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहणार.
- प्रा सचिन गायकवाड, सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य