
नांदेड : नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या २८ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी नांदेड मधील सर्व क्रीडा संघटनांना एकत्र घेऊन मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात चर्चासत्र, विविध स्पर्धा, विविध पुरस्कार, गुणवंत खेळाडूंचा सन्मान आयोजित करण्याचे काम करणाऱ्या नांदेड जिल्हा ऑलिम्पिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ मे रोजी हॉटेल आकृती (कौठा) नांदेड येथे सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे.
या सभेत रिक्त असलेल्या अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार असून चालू वर्षातील ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहाच्या आयोजन संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासोबत नांदेड जिल्ह्यातील नांदेड भूषण गुणवंत खेळाडू, नांदेड भूषण गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, नांदेड भूषण गुणवंत क्रीडा संघटक यांना प्रत्येकी ११ हजार रुपये रोख रकमेसह सन्मानचिन्ह, सन्मानपत्र प्रदान करुन गौरव करण्यात येणार आहे असे संघटनेचे सचिव बालाजी पाटील जोगदंड एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.