
पुणे ः माढा तालुक्यातील वेणेगाव येथील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलगी संजीवनी महादेव पवार हिची महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संजीवनी पवार हिने प्रचंड मेहनत, कष्ट, जिद्द, चिकाटी या गुणांसह अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एमपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी आपले स्थान तयार केले. महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी रायगड संघाकडून संजीवनी पवार हिची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
संजीवनीला अगदी लहानपणापासून खेळाची विशेष आवड होती. कबड्डी, खो-खो, धावणे, कराटे, किक बॉक्सिंग, ज्युदो, सिकाई मार्शल आर्ट, सायकलिंग व सॉफ्ट बॉल खेळामध्ये तिने विभागीय, राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उत्तम अशी कामगिरी केलेली आहे.
इयत्ता दहावी परीक्षेत संजीवनी पवार हिला ९४ टक्के गुण मिळाले होते. पण तिची प्रबळ इच्छा होती ती म्हणजे क्रिकेटमध्ये करिअर करण्याची. यासाठी तिच्या पालकांनी तिला प्रोत्साहन दिले. क्रिकेटचे प्राथमिक धडे तिने टेंभुर्णी येथे संतोष मोटे व रवी कुनाळे यांच्याकडे गिरवले. त्यानंतर संजीवनी पुणे येथील आझम कॅम्पस येथे किरण नवगिरे आणि गुलजार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा सराव करीत आहे. तिने क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले आहेत. यामुळे संजीवनी पवार हिची एमपीएल क्रिकेट लीगसाठी निवड झाली आहे. भारतीय महिलांच्या राष्ट्रीय संघामध्ये खेळण्याचे तिचे ध्येय आणि स्वप्न आहे.