
नाशिक ः नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने ३१ मे आणि १ जून २०२५ रोजी नाशिक जिल्ह्यातील वरिष्ठ खेळाडूंसाठी ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिकच्या पंचवटी येथील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथील सिंथेटिक ट्रॅकवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिलांसाठी विविध आंतर धावणे, रिले, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, हातोडाफेक हे सर्व प्रकार, उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, बांबू उडी हे सर्व प्रकार, स्टीपल चेस, डेकेथलॉन या प्रकारांचा समावेश असणार आहे.
खेळाडूंना कोणत्याही दोन प्रकारात आणि रिले स्पर्धा अशा तीन प्रकारात सहभाग घेता येईल. जिल्हा स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू नाशिक जिल्ह्यातील असावे. आठवा शिक्षण, नोकरी संदर्भात नाशिकमध्ये वास्तव्यास असावे.तसे पुरावे सादर करणे आवश्यक आहे.
या स्पर्धेचे आयोजन ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत तांत्रिक नियमावली प्रमाणे करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना मेडल्स आणि प्राविण्य प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची नाशिक जिल्हा संघामध्ये निवड करण्यात येणार आहे. हे निवड झालेले खेळाडू जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित होणाऱ्या ७३ व्या महाराष्ट्र राज्य मैदानी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
ज्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे अश्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी जिल्हा असोसिएशनचे सचिव सुनील तावरगिरी (९८२२०९०३६७), सहसचिव वैजंयत काळे (८३७८८३५९९९) अथवा संदीप फुगट (९६८९३४२९७४) यांच्याशी संपर्क करावा. नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे आणि सचिव सुनील तावरगिरी यांनी केले आहे.