
आशियाई स्पर्धेत पटकावली तीन पदके
मुंबई ः उझबेकिस्तानमधील ताश्कांद येथे झालेल्या आशियाई सीनियर कराटे अजिंक्यपद आणि आशियाई पॅरा कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय कराटेपटूंनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन कांस्य अशी तीन पदकांची कमाई करत आपला ठसा उमटवला आहे.
ही प्रतिष्ठित स्पर्धा ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाद्वारे मान्यताप्राप्त एशियन कराटे फेडरेशनद्वारे आयोजित केली गेली होती. एकेएफ हे जागतिक कराटे फेडरेशनचे सदस्य आहेत, जे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे मान्यताप्राप्त आहे.

या स्पर्धेत पॅरा कराटेपटू तरुण शर्मा याने वैयक्तिक काता प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अलिशा हिने महिला वैयक्तिक कुमिते प्रकारात ५५ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले. भुवनेश्वरी जाधव हिने महिलांच्या वैयक्तिक कुमिते प्रकारात ६८ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले.
भारतीय कराटे खेळासाठी पहिलाच सामना खेळताना तरुण शर्मा याने पॅरा-कराटेमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात आशियाई पातळीवर भारतासाठी ही एक अभूतपूर्व सुवर्ण कामगिरी ठरली आहे. कराटे इंडिया ऑर्गनायझेशनतर्फे सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतल्यावर, या खेळाडूंचे स्वागत केआयओचे अध्यक्ष भरत शर्मा आणि इतर अधिकाऱ्यांनी केले. कौतुक म्हणून प्रत्येक पदक विजेत्याला १,५१,००० रुपये जाहीर करण्यात आले.अध्यक्ष भरत शर्मा यांनी खेळाडूंसह भारतीय प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख संजीव कुमार जांगरा, सलाउद्दीन अन्सारी आणि महेश कुशवाह, संघ प्रशिक्षक कीर्तना कोंडूरू, संदीप गाडे, सावन कुमार आणि भरत यादव, संघ व्यवस्थापक अभय अतुल यांचे कौतुक केले आहे.