मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे यांचा गौरव

  • By admin
  • May 27, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुस्तकासाठी लाभला पुरस्कार

पुणे ः ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुस्तकासाठी लेखक संजय दुधाणे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठेचा ग्रंथ पुरस्काराने पुण्यात गौरविण्यात आले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२०व्या वधार्पन दिनानिमित्त विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. दिल्‍ली येथील सुप्रसिद्ध हिंदी लेखिका, विचारवंत डॉ सविता सिंह यांच्या हस्ते संजय दुधाणे यांना सन्मानपत्र, रोख रक्‍क्‍कम देऊन सन्‍मानित करण्यात आले. पुण्यातील एस एम जोशी सभागृहात आयोजित कार्यक्रमात अभिनेते अमोल पालेकर, ज्येष्ठ लेखक राजा दीक्षित, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ रावसाहेब कसबे, डॉ शिवाजीराव कदम, प्रा मिलिंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

गतवर्षी ऑलिम्‍पिकमध्ये २ वेळा सुवर्णपदकाचा विक्रम करणाऱ्या नीरज चोप्राचे चरित्र संजय दुधाणे यांनी लिहिले होते. संजय दुधाणे यांनी एका शेतकऱ्याचा मुलगा ते ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकविजेता हा नीरजचा प्रेरणादायी प्रवास शब्दरूप केला आहे. नीरजच्‍या दुहेरी ऑलिम्‍पिक यशाचे साक्षीदार असणाऱ्या दुधाणे यांनी मैदानातील वर्णन हे प्रत्‍यक्ष स्‍पर्धेची अनुभूती देणो ठरले आहे. हे पुस्तक मराठीसह इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध झाले आहे.

ऑलिम्पिक कांस्य पदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांच्‍या हस्‍ते या चरित्राचे प्रकाशन झाले होते. २०२४ मधील पुस्‍तकासाठी संजय दुधाणे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्‍कारने सन्‍मानित करण्यात आले. पुरस्‍कारानंतर साहित्‍य विश्वातून दुधाणे यांचे कौतुक होत आहे. ज्येष्ठ साहित्‍यिक राजा दीक्षित यांनी दुधाणे यांचे अभिनंदन करून सांगितले की, संजय दुधाणे यांचा ऑलिम्पिकचा अभ्यास मोठा आहे. यामुळे ऑलिम्‍पिक विश्वकोश करण्यासाठी त्‍यांना निमंत्रित करण्यात आले होते. क्रीडा लेखन करणारे लेखक महाराष्ट्रात दुर्मिळ आहेत. यामुळे दुधाणे हे अभिनंदनास पात्र आहेत. क्रीडा लेखक संजय दुधाणे यांची आतापर्यंत २० पुस्तक प्रकाशित झाली असून त्‍यांनी लिहिलेल्‍या खाशाबा जाधव, मेजर ध्यानचंद या चरित्र पुस्तकालाही शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

प्रा संजय दुधाणे यांची ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव, संत सीतामाई, संत गणोरेबाबा, मेजर ध्यानचंद, भारतरत्न सचिन तेंडुलकर, फ्लाईंग शीख मिल्खासिंग, सुपर मॉम मेरी कोम, गोल्डन बॉय नीरज ही चरित्रे आणि आशियाई स्पर्धा, वाटचाल ऑलिम्पिकची, क्रीडापर्वणी, कथा ऑलिम्पिकच्या, ऑलिम्पिक अमृतानुभव, खेळांचा राजा-फुटबॉल, भारताचे ऑलिम्पिक, भारतीय खेळ, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी ही क्रीडा विषयक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

संजय दुधाणे यांनी पॅरिस ऑलिम्‍पिक २०२४, टोकियो ऑलिम्पिक २०२१, रिओ ऑलिम्पिक २०१६, लंडन ऑलिम्पिक २०१२, आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच जागतिक हॉकी स्पर्धा, इंग्लडमधील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे थेट वृत्तांकन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *