
मुंबई ः आयपीएलच्या १८ व्या हंगामाचा विजेतेपदाचा सामना ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलच्या समारोप समारंभाची तयारी सुरू केली आहे आणि त्यासाठी एक विशेष योजना आखली आहे. या सोहळ्यात भारतीय सशस्त्र दलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

सीडीएससह तिन्ही सैन्याच्या प्रमुखांना निमंत्रण
बीसीसीआयने ऑपरेशन सिंदूरचे यश साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याअंतर्गत बोर्डाने सीडीएस, लष्कर प्रमुखांसह हवाई दल आणि नौदल प्रमुखांना समारोप समारंभासाठी आमंत्रित केले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये देशाचे रक्षण करणाऱ्या आणि आपल्याला प्रेरणा देणाऱ्या आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्य, धैर्य आणि निःस्वार्थ सेवेला बोर्ड सलाम करतो, असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी वृत्तसंस्था पीटीआयने उद्धृत केले. आदर म्हणून आम्ही समारोप समारंभ सशस्त्र दलांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सचिव सैकिया म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी अहमदाबाद येथे होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी आम्ही तिन्ही सैन्य प्रमुख, उच्चपदस्थ अधिकारी आणि भारतीय लष्कराच्या सैनिकांना आमंत्रित केले आहे.