आरसीबी संघाचा अविस्मरणीय विजय 

  • By admin
  • May 27, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

लखनौ संघाचा सहा विकेटने पराभव, जितेश शर्माची वादळी ८५ धावांची खेळी निर्णायक, ऋषभ पंतचे शतक व्यर्थ  

लखनौ : कर्णधार जितेश शर्मा (नाबाद ८५), विराट कोहली (५४), मयंक अग्रवाल (नाबाद ४१) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर आरसीबी संघाने लखनौ सुपर जायंट्स संघाचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयासह आरसीबी संघाने १९ गुणांची कमाई करत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. पंजाब किंग्ज संघ अव्वल स्थानी आहे. कर्णधार ऋषभ पंत याने धमाकेदार नाबाद शतक ठोकले. मात्र, पंतचे वादळी शतक संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडले. 

आरसीबी संघासमोर विजयासाठी २२८ धावांचे आव्हान होते. लखनौपेक्षा आरसीबी संघासाठी या सामन्याचा निकाल महत्त्वाचा होता. आरसीबी संघाच्या फिलिप सॉल्ट व विराट कोहली या सलामी जोडीने ६१ धावांची भागीदारी करुन संघाला दमदार सुरुवात करुन दिली. सॉल्ट १९ चेंडूत ३० धावा काढून बाद झाला. त्याने सहा चौकार मारले. रजत पाटीदार (१४) व लिव्हिंगस्टोन (०) यांना विल्यम ओरुरके याने एकाच षटकात बाद करुन आरसीबी संघावर दबाव अधिक आणला.

अनुभवी विराट कोहली याने आक्रमक फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. या स्पर्धेत कोहली प्रचंड फॉर्मात आहे. कोहली ३० चेंडूत १० चौकारांसह ५४ धावा काढून बाद झाला. आवेश खान याने कोहलीला बाद करुन मोठा अडसर दूर केला. त्यानंतर मयंक अगरवाल आणि जितेश शर्मा यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद १०७ धावांची भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला. जितेश शर्माने अवघ्या ३३ चेंडूत नाबाद ८५ धावा फटकावत संघाला अविस्मरणीय विजय मिळवू दिला. जितेश याने आठ चौकार व सहा टोलेजंग षटकार मारले. मयंक अग्रवाल याने २३ चेंडूत नाबाद ४१ धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार मारले. विल्यम ओरोर्के याने ७४ धावांत दोन गडी बाद केले. 

लखनौची बहारदार फलंदाजी 
कर्णधार ऋषभ पंतच्या तुफानी शतकाच्या बळावर लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोर २२८ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौ संघाने २० षटकांत तीन गडी गमावून २२७ अशी भक्कम धावसंख्या उभारली. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने सर्वाधिक ११८ धावा केल्या. दरम्यान, आरसीबीकडून नुवान तुषारा, भुवनेश्वर कुमार आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

या सामन्यात लखनौला पहिला धक्का २५ धावांवर बसला. मॅथ्यू ब्रीट्झके याला नुवान तुषाराने त्रिफळाचीत केले. तो १४ धावा करून बाद झाला. तथापि, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार ऋषभ पंतने शानदारद फलंदाजी केली. पंतने मिशेल मार्शसोबत दुसऱ्या विकेटसाठी १५२ धावांची मोठी भागीदारी केली. यादरम्यान मार्शने ३७ चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. त्याच वेळी, ऋषभ पंत फॉर्ममध्ये परतला आणि त्याने ५४ चेंडूत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले. त्याने ६१ चेंडूत ११ चौकार आणि आठ षटकारांसह ११८ धावा काढल्या आणि नाबाद राहिला. बंगळुरूविरुद्ध, पूरन १३ धावांवर आणि अब्दुल समद एका धावेवर नाबाद राहिले.

पंत सर्वात जलद शतक करणारा फलंदाज 
लखनौ संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हा त्यांचा शेवटचा लीग सामना होता. या सामन्यात ऋषभ पंतने कर्णधारपदाची खेळी केली आणि संघाचा धावसंख्या २०० च्या पुढे नेली. त्याने ६१ चेंडूत ११ चौकार आणि आठ षटकारांसह ११८ धावा काढत नाबाद राहिला. पंतने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक फक्त ५४ चेंडूत पूर्ण केले. यापूर्वी २०१८ मध्ये त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ६३ चेंडूत १२८ धावांची नाबाद खेळी केली होती. पंत आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स संघासाठी सर्वात जलद शतक करणारा फलंदाज ठरला. आयपीएलच्या अखेरच्या सामन्यात पंतने शतक ठोकून आपला फॉर्म पुन्हा मिळवला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *