
सोलापूर ः महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन व द हेरिटेजच्या सहकार्याने सोलापूर चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या चॅम्पियन चषक ९ वर्षांखालील खुला गट व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू हेयान रेड्डी व गोरांक्ष खंडेलवाल यांनी सहाव्या फेरी अखेर साडेपाच गुणांसह संयुक्तरित्या आघाडी घेत स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे.
तसेच मुलींच्या गटात मुंबईची गिरीशा पै हिने सहा गुणांसह आघाडी घेत विजेतेपदाकडे वाटचाल सुरू ठेवलेली आहे. तर अनिश जवळकर, नोवा जुयल, इवान दुबे, युवेन झवेरी व लक्ष दिघे हे सर्वजण पाच गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आहेत व मुलींमध्ये ऋत्वि हरपुडे, अन्वी हिंगे, डेलिया खैरनार संयुक्तपणे पाच गुणांसह द्वितीय स्थानावर तर सोलापूरचे पृथा ठोंबरे, संस्कृती व रीना जाधव हे साडेचार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
या स्पर्धेत मुलांमध्ये पहिल्या पटावर पहिल्या पटावर पाचव्या फेरीअखेर पाच गुणांचा आघाडीवर असणाऱ्या युवेन झवेरी व गोरांक्ष खंडेलवाल यांच्यातील डाव रंगतदार झाला. या लढतीत मध्यपर्वात युवेन याने केलेल्या चुकांचा गोरांक्षने अचूक फायदा घेत डावावर निर्णायक वर्चस्व राखले व शेवटी युवेनला डाव सोडण्यास भाग पाडले. पहिल्या पटावर गिरीशा पै व रीवा चरणकर (सातारा) यांच्यातील झालेल्या आकर्षक लढतीत गिरीशाने सुरुवातीपासूनच आक्रमक चाली खेळत डावावर वर्चस्व मिळवले व मध्यपर्वात वजीर, उंट व अश्वाच्या मदतीने रीवाच्या राजावर प्रखर हल्ला चढवत विजय संपादन केला.
स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून प्रमुख पंच मुंबईचे आंतरराष्ट्रीय पंच संदेश नागरनाईक तर त्यांना सहायक वरिष्ठ राष्टीय पंच उदय वगरे, शशिकांत मक्तेदार, वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा, युवराज पोगुल, भरत वडीशेरला, विजय पंगुडवाले, यश इंगळे, नवीना वडीशेरला हे काम पाहत आहेत.