
मुंबई : भाईंदर येथील श्री गणेश आखाड्याची युवा कुस्तीपटू सुप्रिया गुप्ता हिने नुकत्याच झालेल्या दहावी शालांत एसएससी परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवून आपण खेळाबरोबरच अभ्यासात देखील हुशार असल्याचे दाखवून दिले.
सुप्रिया भाईंदर सेकंडरी स्कूलची विद्यार्थीनी आहे. या व्यायाम शाळेत आपली मोठी बहिण डॉली सोबत सुप्रिया कुस्ती खेळाचे गेली पाच वर्षे धडे गिरवत आहे. कुस्तीत लहान वयात चमक दाखवणाऱ्या सुप्रियाने आता एसएससी परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवून व्यायाम शाळेत नवा अध्याय लिहिला आहे. वक्तृत्व स्पर्धेत देखील आतापर्यंत बरीच बक्षीसे मिळवणाऱ्या सुप्रियाने सातवी इयत्तेपासून अभ्यास सिरियसली घेण्यास सुरुवात केली. मोठी बहिण डॉलीने अभ्यासाचे महत्व पटवल्यावर सुप्रियाने मग अभ्यासाची चांगली लय पकडली. डॉलीनेच दहावीच्या अभ्यासाचे वेळापत्रक तिला आखून दिले होते. त्याप्रमाणेच सुप्रियाने अभ्यासाची सांगड घालून घवघवीत यश संपादन केले.
अभ्यासावर जोर देत असताना सुप्रियाने आपल्या कुस्तीमधील सरावात कधी खंड पडू दिला नाही. सकाळ, संध्याकाळच्या दोन सत्रात तिचा नियमित सराव सुरुच होता. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच.आई, वडील, तीन बहिणी, एक भाऊ असे मध्यम वर्गीय गुप्ता कुटुंब. वडील रिक्षा चालवून, स्लायडिंग विंडोज बसवण्याचा व्यवसाय करुन कुटुंबांची गुजराण करतात. त्यामुळे प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन सुप्रियाने मिळवलेले हे यश निश्चित कौतुकास्पद आहे. आपल्या या यशाचे श्रेय ती कुंटुबातील सर्व सदस्य, शाळेतील सर्व शिक्षक वर्ग आणि श्री गणेश आखाड्याचे सर्वेसर्वा असलेल्या वस्ताद वसंतराव पाटील, एनआयएस प्रशिक्षक वैभव माने यांना देते.
भविष्यात सीए होण्याचे आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न आहे. त्यासाठी अथक मेहनत आणि खडतर सराव करण्याची सुप्रियाची तयारी आहे. वस्ताद वसंतराव पाटील यांनी तिचे खास अभिनंदन केले आहे. तसेच एखादा युवा खेळाडू खेळ आणि अभ्यास याची कशी सांगड घालू शकतो याचे सुप्रिया उत्तम उदाहरण असल्याचे पाटील यांनी सांगितले. याच व्यायाम शाळेतील पवन तावरे, जय पवार, लकी अडबल्ले, कविता राजभर, पृथ्वीराज बोबडे यांनी १०वी शालांत परीक्षेत आणि आदर्श शिंदे, बाबासो नरळे, कोमल पटेल, डॉली गुप्ता, हार्दिक मोरे या कुस्तीपटूंनी १२ वीच्या परीक्षेत चांगले यश संपादन केले.