अमृत महोत्सवी मोहिते चषक कॅरम स्पर्धेत तनया, तीर्थ, अमेय, वेदांतची विजयी सलामी    

  • By admin
  • May 28, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने सुरू झालेल्या अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक विनाशुल्क कॅरम स्पर्धेत राष्ट्रीय ख्यातीची सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवी, तीर्थ ठक्कर, अमेय जंगम, वेदांत लोखंडे, संचिता मोहिते, सार्थक केरकर, मयुरेश पवार आदींनी सलामीचे सामने जिंकून आगेकूच केली. 

तनया दळवीने प्रथमपासून आकर्षक फटकेबाजी करीत आयुष मनसुखला १८-४ असे नमविले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, राजन लाड, विलास डांगे, प्रशिक्षक सचिन शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.

परेल येथील आरएमएमएस सभागृहात प्रारंभी जोरदार मुसंडी मारणाऱ्या नेहाल पोमेंडकरचा संयमी खेळ करीत तीर्थ ठक्करने १८-४ असा विजय मिळविला. विजयाचे पारडे दोलायमान झालेल्या सामन्यात अमेय जंगमने नील म्हात्रे विरुध्द ८-७ अशी बाजी मारली. अन्य सामन्यात वेदांत लोखंडेने ध्रुव शाहचा २५-५ असा, संचिता मोहितेने देविका जोशीचा १७-६ असा, सार्थक केरकरने पुष्कर गोळेचा २०-९ असा, मयुरेश पवारने निखिल भोसलेचा ११-३ असा, केतकी मुंडलेने गौरी सावंतचा १५-८ असा तर प्रसन्न गोळेने अर्णव गावडेचा २५-१ असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, जैतापूर विभागातील राष्ट्रीय ख्यातीच्या सबज्युनियर कॅरमपटूसह ३२ शालेय खेळाडूमध्ये चुरशीच्या लढती कॅरम शौकिनांना पाहण्यास मिळत आहेत. पंचाचे कामकाज चंद्रकांत करंगुटकर, संतोष जाधव, अर्जुन कालेकर आदी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *