
ग्रीको-रोमन प्रकारात वर्चस्व
पुणे ः पलवाल (हरियाणा) येथे झालेल्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन विभागाच्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राने ३ सुवर्ण, २ रौप्य, ४ कांस्यपदके अशी एकूण दहा पैकी नऊ पदके मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
या शानदार कामगिरीमुळे महाराष्ट्रास ग्रीको-रोमन विभागामध्ये दोन क्रमांकाची चॅम्पियनशिप प्राप्त झाली. महाराष्ट्राच्या फ्रीस्टाईल कुस्ती संघास कोच तुकाराम चोपडे, ग्रीको-रोमन संघास कोच सोमनाथ कामन्ना व महिला विभागास कोच ऋतुजा पवार यांनी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत ग्रीको-रोमन विभागात यश कामान्ना (सुवर्ण), आदित्य जाधव (सुवर्ण), युवराज कामान्ना (सुवर्ण), स्वराज चौधरी (रौप्य), अभिमन्यू चौधरी (रौप्य), ओमराज वाईगडे (कांस्य), समर्थ गोवेकर (कांस्य), सुरज जामदार (कांस्य), पृथ्वीराज मगदूम (कांस्य) यांनी आपापल्या वजन गटात पदकांची कमाई करुन स्पर्धा गाजवली.
या स्पर्धेतून महाराष्ट्राच्या एकूण सहा कुस्तीपटूंची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्यात धनराज जामनिक (५१ किलो), सुजय तनपुरे (७१ किलो), ऋतुजा गुरव (४६ किलो), यश कामान्ना (४५ किलो), आदित्य जाधव (४८ किलो), युवराज कामान्ना (५१ किलो) या कुस्तीपटूंचा समावेश आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी कुस्तीपटूंचे अभिनंदन केले आहे.