
चॅम्पियन चषक ः लक्ष दिघे व अन्वी हिंगे यांना उपविजेतेपद
सोलापूर ः चॅम्पियन चषक एचटूई पॉवर सिस्टिम्स ९ वर्षांखालील खुला व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम आठव्या फेरीनंतर मुलांच्या गटात पुण्याच्या हेयान रेड्डीने आठ पैकी साडेसात गुण करून अजिंक्यपद पटकाविले. त्याला रोख दोन हजार रुपये, आकर्षक चषक व मेडल्स देऊन गौरविण्यात आले. मुलींच्या गटात मुंबईच्या आंतरराष्ट्रीय गुनांकन प्राप्त खेळाडू गिरीशच्या पै हिने स्पर्धेमध्ये निर्विवाद वर्चस्व राखत आठ पैकी आठ गुण मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तसेच मुलांच्या गटात मुंबईच्या लक्ष दिघे याने सात गुणांसह तर मुलींच्या गटात पुण्याच्या अन्वी हिंगे हिने देखील सात गुणांसह उपविजेतेपद प्राप्त केले.
महाराष्ट्राचे चेस असोसिएशन व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने सोलापूर चेस अकॅडमीने आयोजित ही स्पर्धा गांधीनगर येथील द हेरिटेज येथे संपन्न झाली. स्पर्धेचा बक्षीस समारंभ द हेरिटेजचे व्यवस्थापक श्रवण कुमार, खुशी हजारे, संघटनेचे सचिव सुमुख गायकवाड, प्रमुख पंच मुंबईचे आंतरराष्ट्रीय पंच संदेश नागरनाईक, राष्ट्रीय पंच संतोष पाटील, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, सुभाष उपासे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सहायक वरिष्ठ राष्टीय पंच उदय वगरे, शशिकांत मक्तेदार, रोहिणी तुम्मा, युवराज पोगुल, भरत वडीशेरला, विजय पंगुडवाले, यश इंगळे, नवीना वडीशेरला, नागराज वडीशेरला यांना देखील गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील यांनी केले.
अतिशय चुरशीने झालेल्या मुलांच्या गटात पुण्याचा गोरांक्ष खंडेलवाल व ठाण्याचा दक्ष राऊत या दोघांनी साडेसहा गुण प्राप्त केले. परंतु, सरस टायब्रेकवर गोरांक्षने तिसरा तर दक्षने चौथा क्रमांक पटकाविला. मुलींच्या गटात मुंबईच्या सानामेरी पॉल, छत्रपती संभाजीनगरची प्रियल शिखरे व पुण्याची ऋत्वि हरपुडे यांनी देखील प्रत्येकी सहा गुण मिळवल होते. परंतु सरस टायब्रेकवर सानामेरी हिने तिसरा, प्रियल हिने चौथा तर ऋत्विने पाचवा क्रमांक प्राप्त केला. मान्तिक अय्यर (पुणे), अनिश जवळकर (पुणे), आदित्य सिद्धार्थ (मुंबई), इवान दुबे (मुंबई), अन्वित सोनटक्के (नागपूर), नोवा अय्यर जुयल (मुंबई) यांनी देखील उत्कृष्ट कामगीरी करत प्रत्येकी सहा गुणांसह अनुक्रमे सहावा ते दहावा क्रमांक मिळविला.
मुलींमध्ये रीवा चरणकर (सातारा), पृथा ठोंबरे (सोलापूर), विहा मेहता (अमरावती), अनन्या चव्हाण (मुंबई), अनिश्का बियाणी (मुंबई) यांनी देखील उल्लेखनीय यश मिळवत प्रत्येकी साडेपाच गुणासह सरस टायब्रेकवर अनुक्रमे सहावा ते दहावा क्रमांक प्राप्त केला. सर्वांना रोख बक्षीस, चषक व मेडल्स देऊन सन्मानित केले. तसेच स्पर्धेतील साडेचार वर्षीय सर्वात लहान खेळाडु वल्लभ कुलकर्णी (छत्रपती संभाजीनगर) याला देखील उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
नऊ वर्षांखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला. या संघात हेयान रेड्डी (पुणे), लक्ष दिघे (मुंबई), गिरीशा पै (मुंबई), अन्वी हिंगे (पुणे) यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत रिधान करवा (कोल्हापूर), अद्वैत कुलकर्णी (कोल्हापूर), हितांश सुराणा (छत्रपती संभाजीनगर), श्रेया शेळके (छत्रपती संभाजीनगर), अरिशा वाघमारे (ठाणे), अनाईका कुमारी (छत्रपती संभाजीनगर) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट सोलापूर पुरस्कार हर्ष जाधव, नैतिक होटकर, प्रथम मुदगी, संस्कृती जाधव, उत्कर्षा लोखंडे, ईशा पटवर्धन या खेळाडूंनी संपादन केला.