
लाहोर ः पहिल्या टी २० सामन्यात पाकिस्तान संघाने बांगलादेश संघाचा ३७ धावांनी पराभव केला. या सामन्यात वेगवान गोलंदाज हसन अली याने संघात पुनरागमन करताना थेट कर्णधाराचा विक्रम मोडीत काढत क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे.
सध्या बांगलादेश संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी २० आंतरराष्ट्रीय मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना का लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात आला. पाकिस्तान संघाने ३७ धावांच्या फरकाने विजय मिळवला. या सामन्याचा नायक निश्चितच अष्टपैलू शादाब खान होता, परंतु बऱ्याच काळानंतर संघात परतलेला वेगवान गोलंदाज हसन अलीची कामगिरी दुर्लक्षित करता येणार नाही. त्याने आपल्या संघासाठी लक्ष्याचे रक्षण करताना एकूण ३.२ षटके टाकली. दरम्यान, त्याने ९.०० च्या इकॉनॉमीने ३० धावा खर्च करून पाच विकेट्स घेतल्या.
३० वर्षीय वेगवान गोलंदाजाने एक मोठी कामगिरी देखील केली. पाकिस्तानसाठी टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत त्याने माजी कर्णधार मोहम्मद हाफीजला मागे टाकले आहे. २००६ ते २०२१ दरम्यान हाफिजने पाकिस्तानसाठी ११९ टी २० सामने खेळले आणि ७९ विकेट्स घेतल्या. हसन अलीच्या नावावर आता ६५ विकेट्स आहेत.
एवढेच नाही तर हसन अलीने पाकिस्तानसाठी टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. कालच्या सामन्यापूर्वी तो १० व्या स्थानावर होता.
हसन अली चौथा पाकिस्तानी गोलंदाज
हसन अली टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५ बळी घेणारा पाकिस्तानचा चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी ही मोठी कामगिरी उमर गुल, सुफियान मुकीम आणि इमाद वसीम यांच्या नावावर होती. पण कालच्या सामन्यानंतर त्याचे नावही या खास यादीत जोडले गेले आहे.
पाकिस्तानचे सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप १० गोलंदाज (टी २०)
११८ – हरिस रौफ
११० – शादाब खान
१०२ – शाहीन शाह आफ्रिदी
९७ – शाहिद आफ्रिदी
८५ – उमर गुल
८५ – सईद अजमल
७३ – इमाद वसीम
७१ – मोहम्मद आमिर
६५ – हसन अली
६१ – मोहम्मद हाफिज