
मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर अजिंक्य ठरला.
चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये सार्थक केरकर याने अचूक खेळासह राणीवर सतत कब्जा मिळवून राष्ट्रीय ख्यातीची सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवी हिचा पराभव केला. जिंकलेल्या बोर्डात राणी हुकल्यामुळे महात्मा गांधी विद्यामंदिरच्या तनया दळवी हिला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, जी बी गावडे, मंगेश चिंदरकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.
परेल येथील आरएमएमएस सभागृहात अटीतटीमध्ये रंगलेल्या उपांत्य सामन्यात ६-० असा दमदार प्रारंभ करणाऱ्या चेंबूर हायस्कूलच्या मयुरेश पवारला सार्थक केरकरने १२-६ असे नमविले तर डावाच्या उत्तरार्धापर्यंत १०-७ अशी आघाडी घेणाऱ्या महावीर जैन हायस्कूल-कल्याणच्या संचिता मोहितेला तनया दळवीने १२-१० असे चकविले. परिणामी मयुरेश पवार व संचिता मोहिते यांना उपांत्य उपविजेतेपदावर स्थिरावे लागले.
या स्पर्धेमध्ये उपांत्यपूर्व उपविजेते शेठ जुगीलाल पोद्दार अकॅडमीचा प्रसन्न गोळे, आयईएस पाटकर विद्यालयाचे प्रसाद माने, केतकी मुंडले, निधी सावंत तर उपउपांत्यपूर्व उपविजेते न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, जनरल एज्युकेशन स्कूलचा वेदांत लोखंडे, टीआरपी स्कूलचा तीर्थ ठक्कर, पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम, महावीर जैन हायस्कूलची आर्या बोडके, कानोसिया हायस्कूलची वेदिका पोमेंडकर, ओमकार इंटरनॅशनल स्कूलची प्रेक्षा जैन, आयईएस सुळे गुरुजी हायस्कूलची ग्रीष्मा धामणकर आदी ठरले. पंचाचे कामकाज प्रशिक्षक सचिन शिंदे, चंद्रकांत करंगुटकर, संतोष जाधव, अर्जुन कालेकर यांनी पाहिलें.