तोलानी चषक राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

  • By admin
  • May 29, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

खेळाडूंनी संधीचा फायदा घेऊन भारतीय संघामध्ये आपले स्थान पक्के करावे – डॉ अविनाश देशमुख

नाशिक ः महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनआणि ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नाशिक येथे आयोजित ज्युनियर आणि सब ज्युनियर गटाच्या तोलानी चषक  राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेला गुरुवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

भारत सरकारच्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून ब्रीज या खेळाला मान्यता असून त्यांच्याकडून ब्रीज खेळाच्या सर्व उपक्रमासाठी साईकडून सहकार्य मिळत आहे. तोलानी शिपिंग कंपनी यांनी पुरस्कृत केलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेला गुरुवारी मोठ्या उत्साहात सुरवात झाली. नाशिकच्या गंगापूर रोड, सोमेश्वर मंदिरजवळील गुप्ता गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन ब्रीजच्या ज्युनियर डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन अशोक भावनांनी आणि महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ अविनाश देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रम प्रसंगी साईचे उपसंचालक नितीन कुंडू, साईचे ब्रीज खेळाचे प्रमुख संतोष कुमार, आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू, भारतीय ब्रीज फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि ज्युनियर खेळाडूंच्या डेव्हलपमेंट कमिटीचे सचिव आनंद सामंत, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक अनिल पाध्ये, महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव आणि या स्पर्धेचे आयोजन प्रमुख हेमंत पांडे, महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे खजिनदार प्रसाद होनप, नाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशनचे सचिव अतुल दशपुत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ अविनाश देशमुख यांनी सांगितले की, ब्रीज हा बुद्धीचा खेळ आहे.  ब्रीजच्या माध्यमातून बुद्धीला चालना मिळते. याचा फायदा खेळाबरोबर इतर सर्वच क्षेत्रांत होतो. त्यामुळे खेळाडूंनी या संधीचा फायदा घेऊन भारतीय संघामध्ये आपले स्थान मिळविण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. या स्पर्धेचे स्पर्धेचे आयोजन प्रमुख हेमंत पांडे यांनी सर्व मान्यवर आणि खेळाडू, प्रशिक्षक यांचे स्वागत केले. या स्पर्धेची तांत्रिक बाजू स्पर्धा संचाकल के एस स्वामिनाथन सांभाळत आहेत.  

या स्पर्धेमध्ये भारताच्या १५ विविध राज्यांच्या ९३ खेळाडूंनी सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिला आहे. आंतरराष्ट्रीय ब्रीज फेडेरेशन यांच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार या स्पर्धेमध्ये १६ वर्षे, २१ वर्षे, २६ वर्षे आणि ३१ वर्षे मुले आणि मुली या चार वयोगटाचा अंतर्भाव आहे. या स्पर्धेमध्ये टीम चॅम्पिअनशिप, आय एम पेअर्स आणि मॅच पॉईंट पेअर्स अश्या विविध प्रकारात ही स्पर्धा खेळविली जात आहे.

पहिल्या दोन राऊंड्स मध्ये २६ वर्षे गटामध्ये तिलकराज चौधरी, तरल रोड्रिगेस, विद्या पटेल आणि श्याम गुजर यांच्या संघाने सर्वात जास्त १७ गुण मिळवत या गटात आघाडी घेतली आहे. तर  याच. अंश, अॅलन मॅथ्यू, जोहाना जोस पिंटो, आर्यन मेहता याच्या संघाने त्याखालोखाल १३ गुण मिळवत दुसऱ्या स्थानावर आहेत.

३१ वर्षे गटामध्ये साई मंजू, दिनेश बाबू, सौविक शहा आणि मोनू कुमार यांनी दोन राऊंड्स नंतर ३३. १२ गुण मिळवत या गटात आपली आघाडी प्रस्थापित केली आहे. तर आचार्य, कल्पना गुर्जर, प्रदीप डे आणि स्वरांश चॅटर्जी यांच्या संघानेही सुंदर खेळ करत २३. ५६ गुण मिळवत दुसरे स्थान मिळविले आहे. तर अमित आकर्ष, तरुण, मुकुल कुमार आणि विजय कुमार रंजन यांचा संघ १३. ३२  गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.   

या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये सन २०२१ आणि सन २०२२ या वर्षी जागतिक ब्रीज चॅम्पिअनशिप स्पर्धेमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कास्य  पदके मिळविणाऱ्या खेळाडूंचा समावेश असल्यामुळे या स्पर्धेमध्ये चांगलीच चुरस दिसून येत आहे.

भारतीय संघांची निवड

या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची भारताच्या संघासाठी निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडू ११ ते १७ जुलै दरम्यान इटली येथील सोल्सोमाज ओरे शहरात आयोजित जागतिक ब्रीज स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील अशी माहिती या स्पर्धेचे महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव आणि स्पर्धा प्रमुख हेमंत पांडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *