
चंदीगड ः आयपीएल स्पर्धेचा एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शुक्रवारी खेळला जाईल. हा सामना मुल्लानपूर मैदानावर खेळला जाणार असून जो संघ हा सामना हरेल तो आयपीएलच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
एलिमिनेटर सामन्याचा विजेता पहिला क्वालिफायर जिंकणाऱ्या संघाशी सामना करेल. गुजरात आणि मुंबई यापूर्वीही चॅम्पियन बनले आहेत मुल्लानपूर मैदानावरील खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाज या दोघांसाठी उपयुक्त ठरलेली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत येथे ९ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणारा संघ ५ वेळा विजयी झाला आहे आणि चार वेळा पाठलाग करणारा संघ विजयी झाला आहे. या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा संघ म्हणजे पंजाब किंग्ज, ज्याने २१९ धावा केल्या. पण त्याच मैदानावर, गतविजेता संघ आयपीएल २०२५ मध्ये ९५ धावांवर ऑलआउट झाला आहे.
गुजरात-मुंबई हेड-टू-हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ७ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबईने फक्त २ वेळा विजय मिळवला आहे, तर गुजरातने मुंबई इंडियन्सचा ५ वेळा पराभव केला आहे. आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या गेल्या ४ सामन्यांमध्ये गुजरातने प्रत्येक वेळी एमआयला हरवण्यात यश मिळवले आहे. २०२३ मध्ये दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने मुंबईला हरवले आहे.
आयपीएलमधील गेल्या चार सामन्यांमध्ये गुजरातने मुंबई इंडियन्सवर वर्चस्व गाजवले आहे. त्याच वेळी, आयपीएल २०२५ मध्ये खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये गुजरातने मुंबईवर विजय मिळवला आहे. आकडेवारीनुसार, एलिमिनेटर सामन्यात गुजरात जिंकण्याची शक्यता जास्त दिसते.