
कर्णधार हॅरी ब्रूकचा अर्धशतक आणि पाच झेल टिपण्याचा विक्रम
बर्मिंगहॅम ः पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाने वेस्ट इंडिज संघावर तब्बल २३८ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. इंग्लंडने सहाव्यांदा ४०० धावसंख्या उभारली. या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघ केवळ १६२ धावांवर गारद झाला. तसेच कर्णधार हॅरी ब्रूक याने पाच झेल टिपून एक नवा इतिहास रचला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने आश्चर्यकारक खेळ दाखवला आणि २३८ धावांनी विजय मिळवला. सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ८ गडी बाद ४०० धावा केल्या. इंग्लंडने एकदिवसीय सामन्यात सहाव्यांदा ६ वेळा ४०० धावा करण्याचा पराक्रम केला आहे. एकदिवसीय सामन्याच्या पहिल्या डावात सर्वाधिक वेळा ४०० प्लस धावा करणारा इंग्लंड हा दुसरा संघ आहे. यात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा ४०० प्लस धावा करणारे संघ आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत ७ वेळा हा पराक्रम केला आहे. याशिवाय, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने सामन्यात इतिहास रचला.
असा पराक्रम करणारा पहिला खेळाडू
प्रथम फलंदाजी करताना ब्रूकने ४५ चेंडूत ५८ धावा केल्या आणि क्षेत्ररक्षण करताना तो ५ झेल घेण्यात यशस्वी झाला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात, ब्रूक एकाच सामन्यात अर्धशतक आणि ५ झेल घेण्याचा विक्रम करणारा पहिला खेळाडू बनला आहे. एकदिवसीय सामन्यात हे पहिल्यांदाच घडले आहे. याशिवाय, ब्रूकने क्षेत्ररक्षक म्हणून जॉन्टी रोड्सची बरोबरी केली आहे. रोड्सने १९९३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ५ झेल घेतले होते. म्हणजेच, आता ब्रूकने एका एकदिवसीय सामन्यात ५ झेल घेण्याच्या (एका डावात सर्वाधिक झेल) विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.
इंग्लंड संघाचा उत्तम विक्रम
याशिवाय, इंग्लंड संघ कोणत्याही फलंदाजाने वैयक्तिक शतक न करता ४०० चा आकडा गाठणारा पहिला संघ बनला आहे. यापूर्वी २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ६ विकेटसाठी ३९२ धावा केल्या होत्या.
दुसरा सर्वात मोठा विजय
त्याच वेळी, एकदिवसीय सामन्यांमधील धावांच्या बाबतीत हा इंग्लंडचा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०१८ मध्ये, इंग्लंडने नॉटिंगहॅम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा २४२ धावांनी पराभव केला होता. एकदिवसीय इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवणारा संघ भारत आहे. २०२३ मध्ये भारताने तिरुवनंतपुरम एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभव केला.
संक्षिप्त धावफलक
इंंग्लंड ः ५० षटकात आठ बाद ४०० (जेकब बेथेल ८२, डकेट ६०, रूट ५७, ब्रूक ५८, स्मिथ ३७, बटलर ३७, जॅक्स ३९, सील्स ४-८४, जोसेफ २-६९, ग्रीव्हज २-६८) विजयी विरुद्ध वेस्ट इंडिज ः २६.२ षटकात सर्वबाद १६२ (शाई होप २५, केसी कार्टी २२, अमीर जांगू १४, जेडेन सील्स नाबाद २९, साकिब महमूद ३-३२, जेमी ओव्हरटन ३-२२, आदिल रशीद २-५०).