
मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आरएमएमएसतर्फे मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना मान्यतेने ३१ मे रोजी होणाऱ्या अमृत महोत्सवी क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते चषक जलद बुद्धिबळ स्पर्धेत मुंबई-ठाणे परिसरातील १०२ खेळाडूंमध्ये चुरस होईल.
७ ते १४ वयोगटामध्ये ही स्पर्धा परेल येथील आरएमएमएस वातानुकूलन सभागृहात रंगणार आहे. आरएमएमएसचे पदाधिकारी निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, शिवाजी काळे, बुद्धिबळ प्रशिक्षक राजा बाबू गजेंगी, संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी ९.३० वाजता होईल.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्तची बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्यासाठी फिडे गुणांकन सबज्युनियर बुद्धिबळपटू अबीर अग्रवाल, निर्वाण दर्यानानी, विस्मित सावंत, नील भट, दीक्षान प्रभूखोत, कृष्णाव दर्यानानी, जश पारीक, व्ही प्रीजेश, अर्जुन भंडारी, बेरा मैत्रेयी, आयुष जैठलिया, आयांश पाटील, कौल कोनकर, अवयुक्त पटवर्धन, सक्षम म्हामुणकर, मुमुक्षु मिटकर, समर्थ साळगावकर, सौम्या गोपाळकृष्णन आदींमध्ये चुरस होण्याची शक्यता आहे. स्विस लीग पद्धतीच्या किमान ४ फेऱ्यांमधील प्रत्येक साखळी फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. प्रत्येक वयोगटातील गुणानुक्रमे मुलांमध्ये पहिल्या १५ विजेत्यांना आकर्षक पुरस्कारासह गौरविण्यात येणार आहे.