बीड ः महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे राज्यस्तरीय १८ वर्षांखालील मुला-मुलींची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याचा कबड्डी संघ निवडण्यासाठी शनिवारी (३१ मे) सकाळी दहा वाजता निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या कबड्डी स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याचा कबड्डी संघ निवड चाचणीद्वारे निवडण्यात येणार आहे. गेवराई तालुक्यातील गढी येथे शिवछत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शिवाजीनगर या ठिकाणी शनिवारी सकाळी दहा वाजता निवड चाचणीला सुरुवात होणार आहे. या चाचणीसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक खेळाडू ५० रुपये ठेवण्यात आले आहे.
या निवड चाचणीसाठी खेळाडूंनी जन्मतारखेचा पुरावा, आधार कार्ड झेरॉक्स, शाळेचे बोनाफाईड अथवा दहावी बोर्ड प्रमाणपत्र सोबत आणावे. निवड चाचणी मॅटवर घेण्यात येणार आहे. या निवड चाचणीत अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन
बीड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष विजयसिंह पंडित, आयोजक शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर अमरसिंह पंडित व बीड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह प्राचार्य डॉ विश्वास कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ केतन गायकवाड (9527326006) यांच्याशी संपर्क साधावा.